पाकिस्तानी 'हनी ट्रॅप'मध्ये सापडून देशाशी गद्दारी करणारी एकमेव महिला माधुरी गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 01:25 PM2018-05-19T13:25:01+5:302018-05-19T13:41:43+5:30
'हनी ट्रॅप' म्हणजे परदेशी गुप्तहेर संस्थेने पेरलेल्या लावण्यवती. त्यांच्या मोहक जाळ्यात अडकून आजवर काही भारतीय अधिकाऱ्यांनी देशाशी गद्दारी केल्याचे समोर येत राहिले आहे. मात्र पाकिस्तानी पुरुष अधिकाऱ्याच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकून भारताशी गद्दारी करणारी माधुरी गुप्ता बहुधा पहिलीच महिला अधिकारी असावी.
परदेशात असताना परदेशी लावण्यावतींच्या जाळ्यात म्हणजेच हनीट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणारे पुरुष अधिकारी तर खूप असतील पण शुक्रवारी दोषी ठरवलेली माधुरी गुप्ता तशी पहिली अधिकारी असावी. भारतीय विदेश सेवेतील अधिकारी माधुरी गुप्ताला शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाने दोषी ठरवले. माधुरी होती भारताच्या सेवेत, तेही पाकिस्तानातील भारतीय दुतावासात, मात्र ती भारताऐवजी पाकिस्तानच्या भल्यासाठी काम करत होती. पाकिस्तानी गुप्तहेर एजेंसी आयएसआयचा अधिकाऱ्याच्या प्रेमात ती गुरफटली होती. त्याला ती गोपनीय माहिती पुरवत असे. माधुरीची गद्दारी भारतीय गुप्तचर संस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला लक्षात येऊ न देता दिल्लीला बोलावले आणि जेरबंद केले. आणि अखेर शुक्रवारी ती दोषी ठरली. आज न्यायालयाने तिला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
माधुरी गुप्ता ही १९८३मध्ये भारतीय विदेश मंत्रालयाच्या सेवेत रुजू झाली. तिची पहिली नियुक्ती क्वालालंपूरला झाली. त्यानंतर बगदाद. परदेशात कार्यरत असताना एकाकी राहणारी माधुरी महत्वाकांक्षी स्वभावामुळे योग्य माणूस शोधून त्याला प्रभावित करुन पुढचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात असे. करिअरच्या सुरुवातीलाच सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याची पोस्टिंग असलेल्या मॉस्को दुतावासात तिच्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग केली होती. मात्र ते शक्य झाले नव्हते. बगदादमधील कार्यकाळात एका शिख तरुणाला प्रभावित करुन तिने त्याच्या युनोतील संपर्काचा लाभ उचलला होता. त्या पोस्टिंगमध्ये एका विवाहित अधिकाऱ्याशी तिचे नाते जुळले. ती घनिष्ठता एवढी वाढली की माधुरीविरोधात त्या अधिकाऱ्याच्या पत्नीने अनेकदा लेखी तक्रारी केल्या. त्याच दरम्यान तिची आई आजारी पजली. माधुरी त्यानिमित्ताने बऱ्याच सुट्ट्या घेऊ लागली. तिचा स्वभाव त्रासदायक असल्याचे वरिष्ठांचे मत होऊ लागले. त्यानंतर काही काळ ती दिल्लीत होती. तेथे पद्धतशीर प्रयत्न करुन तिने इस्लामबाद दुतावासात नियुक्ती मिळवली. त्यासाठी तिने उर्दूवरील प्रभूत्वाचा लाभ मिळवला. सेवेदरम्यान ती पीएचडीही करत होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी तिला भरपगारी रजा दिली नाही. त्यामुळे वरिष्ठांबद्दल एक तिरस्कार, राग तिच्या मनात नेहमीच होता.
तिची पाकिस्तानातील इस्लामाबादमधील भारतीय दुतावासात नियुक्ती झाली. ही नियुक्ती खूप महत्वाची तशीच संवेदनशीलही मानली जाते. तेथे नियुक्त भारतीय अधिकाऱ्यांवर आयएसआयची २४तास नजर असते. तसेच त्यांना बाहेर कोठेही जायचे असेल तरी कडेकोट सुरक्षेत काहीवेळा तर चिलखती गाड्यांमधूनच जावे लागते. माधुरी मात्र जणू अपवाद होती. तिने कोणालाही आपलेसे करण्याच्या स्वभावाच्या बळावर मोठा मित्रपरिवार जमवला होता. त्यातच तिचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खटके उडू लागले. ती थेट आयएफएस नसून प्रमोटी असल्याचा उल्लेख करत ते टोमणे मारत अशी तिची तक्रार असे. त्यातून ती आपल्या मनातील खंत संपर्कात येणाऱ्यांसमोर व्यक्त करत असे. तिची ती खंत ही संधी असल्याचे नेमके ओळखले ते राणा या पाकिस्तानी आयएसआय अधिकाऱ्याने. पत्रकार किंवा व्हिसासाठी येणारा सामान्य नागरिक म्हणून भारतीय दुसावासात सातत्याने येत त्याने तिच्याशी मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिच्या मनातील वरिष्ठांबद्दलचा राग पद्धतशीरपणे चेतवत नेला. त्यातून ती राणाच्या जवळ जात राहिली.
माधुरी राणाच्या जाळ्यात गुरफटली. ती त्याच्या एवढी जवळ पोहचली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होऊ लागली. एक ब्लॅकबेरी फोन आणि वैयक्तिक वापरातील काँप्युटरचा वापर करुन ती माहिती पुरवू लागली. त्या अधिकाऱ्याने तिला ईमेलचा वापर करुन कशी पकडले न जाता माहितीची देवाण-घेवाण करायची ते शिकवले. त्याचा ती वापर करु लागली. संशय असाही होता की ती भारतातील आयएसआय एजंटच्या माध्यमातून माहिती पुरवत असे. तसे केल्यामुळे संशय येणार नाही अशी आयएसआयची रणनिती होती. मात्र माधुरीच्या इस्लामाबादमधील नेमणुकीनंतर सहा महिन्यातच तिच्या वागण्यामुळे ती रॉच्या नजरेत आली होती. तिच्यावर गुप्ततेने पाळत ठेवली जात होती. त्यातही तिचा एक वरिष्ठ अधिकारी हा विदेश सेवेतील नसून रॉचा एजंट असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळले, ते रॉच्या पाकिस्तानी सेवेतील गुप्तहेरांनी त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर तिच्यावरची पाळत वाढली.
A Delhi Court today convicted Madhuri Gupta, then second secretary of Indian High Commission in Islamabad in an espionage case. She was arrested in 2010 and was accused of leaking classified information to Pakistan's Inter-Services Intelligence (ISI).
— ANI (@ANI) May 18, 2018
माधुरीला जाणीवपूर्वक एक माहिती मिळू देण्यात आली. ती माहिती पाकिस्तानी एजेंटकडे पोहचल्याचे उघड होताच तिच्याविरोधात कारवाई नक्की झाली. अर्थात तिला तडकाफडकी परत बोलावूनही चालणार नव्हते. तसे केले असते तर तिला, तिच्या पाकिस्तानी हँडलरना संशय आला असता, त्यामुळे योग्य संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी संधी भूतानमधील सार्क देशांच्या परिषदेच्या निमित्ताने आली. त्या परिषदेत माध्यमांशी समन्वय साधण्यासाठी माधुरीची निवड करण्यात आली. ती आनंदाने भारतात आली. ती येताच तिला जेरबंद करण्यात आले.
माधुरी एवढी पोहचलेली की तिला अटकेच कारण सांगताच ती उद्गारली, "तुम्हाला खूप उशीरा लक्षात आले!" माधुरीविरोधात दिल्लीच्या न्यायालयात खटला चालला. शुक्रवारी १८ मे रोजी, अटकेनंतर आठ वर्षांनी माधुरी दोषी ठरली. आजवर हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या पुरुष अधिकाऱ्यांच्या जोडीने बहुधा प्रथमच एका महिला अधिकाऱ्याचे नाव आले. अपमानातून पेटून उठणे...त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकणे...देशाशी गद्दारी करणे...सारं काही गमावणे! माधुरी गुप्तांचा हा प्रवास ऱ्हासाचाच. सर्व काही संपवण्याचाच!