धक्कादायक! कोविशील्डचे १० हजार डोस गायब; आता डोसही मिळेनात अन् रुग्णालयही सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 14:38 IST2021-06-09T14:32:39+5:302021-06-09T14:38:41+5:30
सीरमकडून थेट खरेदी केलेले कोरोना लसींचे डोस अचानक गायब झाल्यानं खळबळ

धक्कादायक! कोविशील्डचे १० हजार डोस गायब; आता डोसही मिळेनात अन् रुग्णालयही सापडेना
जबलपूर: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्यानं अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यातच मध्य प्रदेशात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण
मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केयर रुग्णालयाच्या नावानं कोविशील्डचे १० हजार डोस खरेदी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे डोस कुठे गेले याची माहिती कोणाकडेही नाही. जबलपूरमध्ये अशा नावाचं कोणतंही रुग्णालय नसल्याचं जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन दिवस रुग्णालयाचा शोध सुरू होता. मात्र अशा नावाचं कोणतंही रुग्णालय आढळून आलं नाही. त्यामुळे कोविशील्डच्या लसी कोणी खरेदी केल्या आणि त्या आता कुठे आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू
मध्य प्रदेशातील ६ खासगी रुग्णालयं थेट सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशील्ड लसी खरेदी करत आहेत. जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेरमधील प्रत्येकी एक आणि इंदूरमधील तीन खासगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. या रुग्णालयांनी आतापर्यंत ४३ हजार डोस खरेदी केले आहेत. यापैकी जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केयर इन्स्टिट्यूटनं १० हजार डोस खरेदी केले आहेत. एका वायलमध्ये १० डोस असतात.
लसीकरणाशी संबंधित ऍपवर दोन दिवसांपूर्वीच मला एक मेसेज मिळाल्याचं लसीकरण अधिकारी डॉ. शत्रुघ्न दहिया यांनी सांगितलं. 'जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूटला १० हजार डोस देण्यात आल्याची माहिती होती. मी पहिल्यांदाच या रुग्णालयाचं नाव ऐकलं. सीएमएचओच्या माध्यमातून या रुग्णालयाचा शोध घेण्यात आला. मात्र या नावाच्या कोणत्याही रुग्णालयाची नोंद सापडली नाही. भोपाळमधील अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे,' असं दहिया म्हणाले.