सलग 8 वेळा विजयी झाल्यावर मंत्र्यांना फुल कॉन्फिडन्स; म्हणाले, "आता पंतप्रधानांच्या खुर्चीवर लक्ष"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:37 PM2023-12-05T12:37:26+5:302023-12-05T12:57:42+5:30
Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शाह यांनी आपल्या 33 वर्षांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
प्रत्येक नेत्याचं मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं स्वप्न असतं. मध्य प्रदेशच्या हरसूद मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार झालेल्या विजय शाह यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शाह यांनी आपल्या 33 वर्षांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 60 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय एकूण मतांच्या 64.32% इतका आहे. एवढ्या मोठ्या विजयाचा त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
निवडणुकीतील मोठ्या विजयामागचं कारण काय? असा प्रश्न विचारला असता विजय शाह यांनी आपल्या बोटात असलेली कासवाच्या आकाराची रत्नजडीत अंगठी दाखवली आणि राजकारणाच्या या शर्यतीत ते ससा नसून कासवाच्या गतीने चालतात. हळू हळू कासव निश्चितपणे त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचतं असं सांगितलं. पुढचं ध्येय हे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आहे का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला.
विजय शाह यावर हसत हसत अटलजी, कलाम साहेबांचे स्मरण करत म्हणाले की, स्वप्नं मोठी असावीत. पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे का? यावर शाह यांनी होय, पंतप्रधान होणार असं म्हटलं. विजय शाह हे 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी खंडवा जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या हरसूदमधून पहिल्यांदा भाजपाकडून आमदार म्हणून निवडून आले होते.
शाह यांनी यानंतर अशी जादू दाखवली की एकापाठोपाठ आठ विधानसभा निवडणुका जिंकत राहिले. हा परिसर भाजपाचाच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचाही बालेकिल्ला बनला. याच दरम्यान, काँग्रेसने येथे मुसंडी मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र ते प्रत्येक वेळी अपयशी ठरले. मध्य प्रदेशात अनेक मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत, काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनाही मतदारांनी नाकारले आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.