पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी बस देण्यास ट्रॅव्हल मालकांचा नकार; कारण ऐकून उडाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:16 PM2018-09-25T12:16:23+5:302018-09-25T12:43:03+5:30

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी (25 सप्टेंबर) भाजपा कार्यकर्त्यांच्या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण लाखो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

madhya pradesh bus operators deny to give buses for pm narendra modi bhopal program | पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी बस देण्यास ट्रॅव्हल मालकांचा नकार; कारण ऐकून उडाल!

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी बस देण्यास ट्रॅव्हल मालकांचा नकार; कारण ऐकून उडाल!

Next

नवी दिल्ली : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी (25 सप्टेंबर) भाजपा कार्यकर्त्यांच्या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यभरातून कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी राज्याच्या प्रदेशाध्यक्षावर सोपवण्यात आली आहे. पण लाखो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बस चालकांनी भाजपा कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचवण्यास नकार दिला आहे. आधीचे कोट्यवधी रुपयांचे थकीत भाडे देणे बाकी असल्यानं बस देण्यास चालकांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात, बस चालकांसोबत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री भूपेंद्र सिंह यांनी दिली आहे. तर दुसरीकडे बस चालकांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की, यापूर्वीही भाजपानं आयोजित केलेल्या सभांसाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळेस याचे भाडे जवळपास 3 कोटी 17 लाख रुपये इतके झाले होते, हे बसभाडे भाजपाकडून अद्यापपर्यंत चुकवण्यात आलेले नाही.  त्यामुळे थकीत बस भाडे देण्याची मागणी चालकांनी केली आहे.   

बस चालकांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वीही भाजपा आणि सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे, यावेळेसही बस चालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे देणे बाकी असलेल्या बसभाड्याची भरपाई करावी. बसभाडे दिल्यानंतरच बसेस भोपाळकडे रवाना होतील, या मागणीवर बसचालक अडून बसले आहेत. 

यावर परिवहन मंत्री भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, बसचालकांसोबत बोलणी झाली असून त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मंगळवारी भोपाळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा होणारा महाकुंभ मेळावा हा जगातील सर्वात मोठा राजकीय कार्यक्रम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित राहणार आहेत. भाजपा कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पण बसचालकांनी नकार दिल्यानं आता 10 लाख कार्यकर्ते भोपाळमध्ये पोहोचणार कसे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

दरम्यान, रविवारी(23 सप्टेंबर) संध्याकाळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी कार्यक्रमाचे योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे की नाही, याची पाहणीदेखील केली. कार्यकर्ता मेळाव्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरण्याचे कार्य हा महाकुंभ मेळावा करेल. 2008 आणि 2013मध्येही 'कार्यकर्ता महाकुंभ'चे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीदेखील कार्यकर्ते महाकुंभसाठी मेहनत घेत आहेत. आव्हान मोठे आहे, कार्यक्रम मोठा असल्याच्या दृष्टीकोनातून आम्हीदेखील मोठी तयारी करत आहोत. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

 

Web Title: madhya pradesh bus operators deny to give buses for pm narendra modi bhopal program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.