मध्यप्रदेशात ताई आणि भार्इंवर शिवराज सिंह भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:28 AM2018-11-14T05:28:49+5:302018-11-14T05:29:31+5:30
इंदूरमधील जागासाठी रस्सीखेच; महाजन समर्थकांना तिकीट नाही, नेत्यांच्या कुटुंबातील १० जणांना उमेदवारी
आसिफ कुरणे
भोपाळ : मध्यप्रदेशच्या राजकारणात कैलाश विजयवर्गीय, सुमित्रा महाजन यांना मोठे नेते मानले जाते. त्यात कैलाश विजयवर्गीय तर कटशहाच्या राजकारणात माहीर आहेत. पण यंदा भाजपच्या तिकीटवाटपात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचाच वरचष्मा राहिला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन इंदूरमधून आठ वेळा लोकसभेवर गेल्या आहेत. ताई नावाने त्या सुपरिचित आहेत.
महासचिव कैलाश विजयवर्गीय भाई नावाने ओळखले जातात. दबावाच्या राजकारणात ते मुरलेले खेळाडू आहेत. पण यावेळी त्यांचे फासे हवे तसे पडले नाहीत. इंदूरमध्ये आपले नातेवाईक व समर्थकांना उमदेवारी मिळाली, यासाठी महाजन, विजयवर्गीय यांनी प्रयत्न केले. विजयवर्गीय यांनी इंदौर -२ मधून मुलगा आकाशसाठी तिकीट मागितले होते. तर मऊमधून तगडा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा अंदाज विजयवर्गीय यांनी बांधला होता. पण शिवराज सिंह यांनी आकाश विजयवर्गीय याला इंदूर-३ मधून तर विद्यमान आ. उषा ठाकूर यांना महू येथून उमेदवारी दिली. कैलाश विजयवर्गीय मुलाखेरीज आ. रमेश मेंदोला वा माजी आ. जितू जिराती यांच्यासाठी प्रयत्नशील होते. त्यापैकी आकाश व रमेश मेंदोलाला उमेदवारी मिळाली.
सुमित्रा महाजन यांना मात्र इंदूरमधून मुलगा, सून व कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले. तिकीट वाटपाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदार महाजनसाठी इंदूर- १ किंवा ३ मधून उमेदवारी मिळवून देण्यासाठी सुमित्राताई प्रयत्नशील होत्या. त्यांना महू किंवा राऊमधून उमेदवारी शक्य होती. पण तेथून निवडून येण्याची संधी कमी असल्याने त्यांनी फारशी रूची दाखवली नाही. इंदूरच्या ९ पैकी एकाही जागेवर हव्या त्या व्यक्तीला उमेदवारी मिळवून देऊ शकल्या नाहीत. याला ताई-भाईमधील अंतर्गत वाद हेही कारण आहेच.
लोकसभेची गणिते
सुमित्रा महाजन आता ७५ वर्षाच्या असल्यामुळे त्यांना २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून ते येथून लोकसभा लढवू शकतात असे त्यांचे समर्थक सांगतात. इंदूरमधील काही मतदारसंघात विजयवर्गीय यांचा दबदबा असून ते निवडणुकीचे पारडे फिरवू शकतात. विधानसभा निवडणुकीत त्यांना न मिळालेले तिकीट कदाचित लोकसभेच्या दृष्टीने संकेत असू शकतात.
तिकीटवाटपात घराणेशाही
भाजप, काँग्रेसकडून तिकीटवाटपावेळी नेत्याची मुले, सुना, नातेवाईक यांना झुकते माप दिले आहे. भाजपच्या यादीत जवळपास ४० उमेदवार हे खासदार, आमदार, पक्षाचे नेते यांचे नातेवाईक आहेत. आकाश विजयवर्गीय , कृष्णा गौर, मुदीत शेजवर, विक्रम सिंह या नेतेपुत्रांना पक्षाने तिकिटे दिली आहेत, तर काँग्रेसकडून नेत्यांच्या कुटुंबातील १० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.