मध्यप्रदेश - संतप्त शेतक-यांनी फाडले जिल्हाधिका-याचे कपडे
By admin | Published: June 7, 2017 10:57 AM2017-06-07T10:57:45+5:302017-06-07T11:18:16+5:30
मध्यप्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून तणाव वाढला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 7 - मध्यप्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून तणाव वाढला आहे. बुधवारी सकाळी बरखेडापंत गावातील शेतक-यांनी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह नेऊन रस्त्यावर आंदोलन करत चक्काजाम केला होता. तणाव वाढत चालल्याचं पाहून प्रशासनाने परिसरात कर्फ्यू जाहीर केला. जिल्ह्यातील काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतक-यांनी मंदसौरच्या जिल्हा दंडाधिका-यासोबत धक्काबुक्की केल्याचं वृत्त आहे. शेतक-यांचा संताप पाहता अधिका-यांनीही तेथून पळ काढला. शेतक-यांनी तर जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करत त्यांचे कपडेही फाडून टाकले.
महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला. अजूनही शेतक-यांच्या अंगावर गोळी लागल्याचे निशाण असताना जिल्हा प्रशासन मात्र गोळीबार केला नसल्याचं म्हणत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांनी पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकऱणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पोलिसांना शेतक-यांवर कोणत्याही परिस्थितीत गोळीबार न करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मृत्यू झालेल्या शेतक-यांची ओळख पटली असून कन्हैयालाल पाटीदार, बबलू पाटीदार, चेन सिंह पाटीदार, अभिषेक पाटीदार आणि सत्यनारायण अशी त्यांची नावे आहेत. अभिषेक आणि सत्यनारायण यांना उपचारासाठी इंदोरला नेलं जात असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मात्र ना आम्ही गोळी चालवली, ना चालवण्याचा आदेश दिला अशी माहिती दिल्याचं स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल.
दरम्यान गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंदसौरला जाणार असल्याची माहिती आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना मंदसौर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
Madhya Pradesh: Protesting farmers scuffled with #Mandsaur collector, chased away officers.
— ANI (@ANI_news) June 7, 2017
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरून मंगळवारी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारचे शेतकऱ्यांशी युद्ध सुरू असून, ते आपले हक्क मागणाऱ्या अन्नदात्यांना बंदुकीच्या गोळ्या भरवत आहे, असे ते म्हणाले.
Madhya Pradesh: Protesting farmers got into a scuffled with #Mandsaur collector and SP for delay in their visit, demand presence of MP CM. pic.twitter.com/H6Q9W2kWIi
— ANI (@ANI_news) June 7, 2017
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केले.
There was no order to open fire, I have assured them (farmers) a strict action: #Mandsaur collector Swantra Singh. pic.twitter.com/FDUiGxSK4F
— ANI (@ANI_news) June 7, 2017
पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन मंगळवारी हिंसक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.