"नरेंद्र मोदींच्या दाढीप्रमाणे वाढतेय महागाई; लोकांच्या ताटातील पदार्थ होताहेत कमी"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:10 PM2021-10-27T19:10:29+5:302021-10-27T19:22:43+5:30
Kamalnath And Narendra Modi : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे.
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड वर्षामध्ये पेट्रोल 36 रुपये आणि डिझेल 26.58 रुपयांनी महाग झाले आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही 7 शहरांमध्ये पेट्रोलची 110 रुपये अधिक दराने विक्री होत आहे. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (Kamalnath) यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोचरी टीका केली आहे.
कमलनाथ यांनी वाढत्या महागाईची तुलना थेट पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ बुरहानपुरला पोहोचले होते, यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "जे लोक दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, जसजसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई आता एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत" असं म्हणत कमलनाथ यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर कमलनाथ यांनी निशाणा साधला.
"शिवराज सिंह चौहान चांगले अभिनेते, सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात, जनतेची दिशाभूल करतात"
"शिवराजजींबद्दल मी सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहे की, ते चांगले अभिनेते आहेत, चांगले कलाकार आहेत. त्यांना कलेची चांगली जाण आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात" असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांना कमलनाथ यांनी सणसणीत टोला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना महामारीमुळे कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. मात्र, त्याचा लाभ जनतेला मिळाला नाही. सरकारने मे 2020 मध्ये उत्पादन शुल्कामध्ये मोठी वाढ केली. राज्यांनीही व्हॅट वाढविला.
कच्च्या तेलाचे दरही वाढले
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागताच कच्च्या तेलाचे दरही वाढले. सध्या कच्च्या तेलाचे दर 85 डॉलर्स प्रति बॅरल या पातळीवर आहेत. पेट्रोलच्या दरात 28 सप्टेंबरपासून 19 वेळा तर डिझेलच्या दरात 24 सप्टेंबरपासून 22 वेळा वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. इंधनविक्रीवरील निधीचा वापर मोफत कोरोना लस, कोट्यवधी लोकांना अन्न, घरगुती गॅसचा पुरवठा तसेच रस्तेबांधणी आणि इतर योजनांसाठी होत आहे.