तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:18 AM2022-04-01T09:18:27+5:302022-04-01T09:18:54+5:30
विचित्र कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये २६ जानेवारी २००१ नंतर ज्या शिक्षकांना तिसरे अपत्य झाले त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. असे ९५५ शिक्षक आहे, परंतू आतापर्यंत १६० शिक्षकांनीच या नोटीसीला उत्तर दिले आहे. ही उत्तरे वाचून शिवराजसिंह सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
या शिक्षकांनी अशी कारणे शोधली आहेत, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. आम्ही जेव्हा नोकरी पत्करली तेव्हा असला काही नियमच नव्हता, असे कारण काही शिक्षकांनी दिले आहे. तर काही शिक्षकांनी आम्ही नसबंदी ऑपरेशन केले परंतू ते फेल गेल्याचे कारण दिले आहे. आणखी एक कारण म्हणजे आम्हाला तिसरे मुल झाले, परंतू आता आम्ही त्यातील एक मुल नातेवाईकांना दत्तक देऊ असे म्हटले आहे.
अशा कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे.
२६ जानेवारी २००१ ला सरकारने शिक्षण विभागाला एक नियम लागू केला होता. त्यामध्ये तिसरे मुल झाले तर त्या शिक्षकाला आपली नोकरी गमवावी लागेल असे म्हटले होते. विधानसभेत यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी अतुल मोदगिल यांनी अशा शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शिक्षकांना आता १५ दिवसांत उत्तर द्यायचे आहे. अनेकांनी आपल्याला या नियमाची माहिती नव्हती असेही कारण दिले आहे. आता या नोटीशींमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.