मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:55 AM2019-05-24T04:55:32+5:302019-05-24T04:56:16+5:30
चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.
- गजानन चोपडे
चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. २०१४ मध्ये २९ पैकी दोन जागांवर असलेल्या काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या परंपरागत गुना मतदार संघातून पराभूत झाल्याने काँग्रेस पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
भोपाळमधून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना भाजपच्या प्रज्ञा सिंग यांनी पराभवाची धूळ चारली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांचे चिरंजीव अजय सिंग राहुल यांनाही मतदारांनी नाकारले. अनेक दिग्गजांचा पराभव करीत भाजप उमेदवारांनी २८ जागांवर आघाडी घेतली. ‘मामा भूल हो गई’, असे आता मतदार बोलू लागल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केली आहे.
अवघ्या चार महिन्यातच मतदारांना काँग्रेसचा खरा चेहरा दिसून आला आणि त्याचे उत्तर मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याचेही शिवराज सिंग सांगतात. मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांचा अपवाद वगळता काँग्रेसच्या हाती काहीच लागले नाही.
निकालाची कारणे
विधानसभा निवडणुकीत भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनाच पहिली पसंती दिली
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यपद्धतीची तुलना होऊ लागली आहे.
विधानसभेतील यशानंतर पक्षसंघटनेकडे काँग्रेसच्या एकाही नेत्याने लक्ष दिले नाही. काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली नाही.