हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:42 PM2023-05-17T12:42:12+5:302023-05-17T12:49:59+5:30
रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने येथे एका पित्याला आपल्या लेकीचा मृतदेह बाईकवरून घेऊन जावा लागला.
मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल शहडोलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने येथे एका पित्याला आपल्या लेकीचा मृतदेह बाईकवरून घेऊन जावा लागला. या घटनेशी संबंधित काही फोटोही समोर आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री कोटा गावात 13 वर्षीय माधुरी गोंड या मुलीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी गोंडच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सांगण्यात आले की नियमानुसार 15 किमी अंतरावर वाहन मिळू शकते, तर त्यांचे गाव रुग्णालयापासून 70 किमी अंतरावर आहे. .
गरीब नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकेचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे मृतदेह बाईकवर ठेवून ते निघून गेले. मात्र बाईक शहराबाहेर येताच रात्रीच कोणीतरी जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांना फोन करून माहिती दिली. मध्यरात्री मृतदेह घेऊन जाणाऱ्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी स्वत:हून अडवले. मृतदेह तातडीने पाठविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पीडितेच्या पालकांना वाहन उपलब्ध करून दिलं आणि मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात आला. आदिवासीबहुल शहडोलमधून कधी खाटांवर, कधी लाकडी फळ्यावर, कधी सायकलवर, कधी बाईकवरून मृतदेह वाहून नेल्याचे वेदनादायक आणि दुःखद फोटो समोर येत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.