मध्यप्रदेशात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; ३ वैमानिक जखमी
By admin | Published: November 20, 2014 02:05 AM2014-11-20T02:05:17+5:302014-11-20T02:05:17+5:30
संपर्क तुटल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला तेव्हा ते धावपट्टीपासून ५५० मीटर अंतरावर कोसळल्याचे आढळून आले. यात तीनजण जखमी झाले
इंदूर : मध्य प्रदेश फ्लार्इंग क्लबचे एक प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ परिसरात नियमित अभ्यासादरम्यान कोसळले. या अपघातात फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षकासह दोन वैमानिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
विमानतळाचे प्रभारी संचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फ्लाइंग क्लबचे एक विमान सेसना १५२ हे नियमित अभ्यासादरम्यान विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ कोसळले. यात प्रशिक्षक पवनदीप सिंग व वैमानिक अर्शद कुरेशीसह अन्य एक वैमानिक होता. दोन आसनी व एकल इंजिन असलेले हे विमान आपला नियमित सराव करीत असताना त्याचा नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क सकाळी १०.५५ वा. तुटला. हे विमान टच अँड गो या पद्धतीने सराव करीत होते. या पद्धतीत आकाशात एक चक्कर मारल्यानंतर ते जमिनीवर येऊन पुन्हा आकाशात उड्डाण घेत होते. या विमानाने दुसऱ्यांदा उड्डाण केल्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता. संपर्क तुटल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला तेव्हा ते धावपट्टीपासून ५५० मीटर अंतरावर कोसळल्याचे आढळून आले. यात तीनजण जखमी झाले.
वैमानिक कुरेशी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात असून, जोपर्यंत या वैमानिकांना शुद्ध येत नाही तोपर्यंत काहीच स्पष्ट होऊ शकत नाही असे मुख्य प्रशिक्षणाधिकारी मंदार महाजन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)