मध्यप्रदेशातील आदिवासी मुलीची ऑक्सफोर्डमध्ये निवड
By Admin | Published: September 17, 2016 09:44 AM2016-09-17T09:44:01+5:302016-09-17T09:44:01+5:30
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात राहणारी आदिवासी मुलगी 16 वर्षीय आशा गोंद इंग्लिश भाषा शिकण्यासाठी ऑक्सफोर्डला चालली आहे
>ऑनलाइन लोकमत
भोपाल, दि. 17 - मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात राहणारी आदिवासी मुलगी 16 वर्षीय आशा गोंदसाठी आकाश ठेंगणं झालं आहे. कारण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी ती ऑक्सफोर्डला चालली आहे. तिच्या पासपोर्टचं काम पुर्ण झालं की लवकरच ती इंग्लंडला रवाना होणार आहे. प्रयत्नांची पराकष्टा केली तर स्वप्नही सत्यात उतरतात, फक्त गरज असते ती चिकाटीची, आणि असंच काहीसं आशा गोंदच्या बाबतीत घडताना दिसत आहे.
आशा गोंद मुळची जानवार गावातील आहे. जर्मनीहून रेनहार्ड या तेथील आदिवासी मुलांना स्केटिंग आणि इंग्लिश भाषा शिकवण्यासाठी आल्या होत्या. त्यामध्ये आशा गोंदचाही समावेश होता. त्यांच्यासोबत शिकताना आशाने फार लवकर इंग्लिश भाषा आत्मसात केली आणि त्यानंतर कुतुहूल वाढत गेलं आणि आवड निर्माण झाली. तिची प्रगती पाहून रेनहार्ड यांनी आशाला इंग्लंडला आपल्यासोबत नेऊन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
'आशाने नुकतीच दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. इंग्लिश भाषा शिकताना तिने फार चांगली प्रगती केली. इंग्लंडला नेऊन इंग्लिश भाषा शिकवण्याचं आश्वासन मी तिला दिलं. सुरुवातीला तिचे आई - वडिल मुलीला इतक्या लांब पाठवण्यास तयार नव्हते. त्यांना तयार करायला मला आठ महिने लागले. अनेकवेळा त्यांच्या घरी गेली. आशाच्या आईशीही मी बोलले. त्यांचं सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. हे लोक अत्यंत साधे असून मुलगी एकदा 18 वर्षाची झाली की लग्न लाऊन देतात. इंग्लिश शिकायला मिळण्याचं आणि तेदेखील परदेशात याचं महत्व त्यांना पटवून देणं कठीणच,' असं रेनहार्ड यांनी सांगितलं आहे.
रेनहार्ड यांनी पुर्ण प्रयत्न केले, मात्र काहीच होताना दिसत नाही हे पाहून त्यांनी स्थानिक आमदार आणि आशाचे शिक्षक अवध बिहारी यांची मदत घेतली. तुमची मुलगी सुरक्षित असेल आणि खूप काही शिकायला मिळेल असं त्यांना व्यवस्थित पटवून दिलं तेव्हा कुठे ते तयार झाले.
आशाने मिळालेल्या संधीचं नेहमीच सोनं केलं आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन पुन्हा परत आल्यानंतर मुलांना शिकवण्याची तिची इच्छा आहे. परत आल्यानंतर लगेच लग्न लाऊन ने देण्याचंही तिच्या आई-वडिलांनी मान्य केलं आहे.