हृदयद्रावक! गोहत्या रोखण्याचं काम करणाऱ्या दोन मित्रांचा गायीला वाचवतानाच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:06 AM2021-11-30T11:06:37+5:302021-11-30T11:06:58+5:30
कायम सोबत राहणाऱ्या दोन मित्रांचा रस्ते अपघातात मृत्यू; परिसरात हळहळ
राजगढ: मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दोन्ही मित्रांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला, तर कार चालवत असलेल्या मित्रानं उडी मारून जीव वाचवला. रस्त्यावर असलेल्या गायींना वाचवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
दोन हिंदुत्ववादी नेते लखन नजर आणि लेखराज त्यांचा मित्र राहुल जोशीसोबत कारनं खुजनेर रोडवरून जात होते. तितक्याच समोर काही गायी आल्या. त्या गायींना वाचवण्यासाठी राहुलनं कारची दिशा बदलली. मात्र त्यावेळी त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. कार उलटली आणि एका विहिरीत पडली. यामध्ये दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. जवळपास ४ तासांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. त्यावेळी दोघांचे हात एकमेकांच्या खांद्यावर होते. मरणानंतरही एकमेकांची साथ न सोडलेल्या दोन मित्रांना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
लखन नेजर आणि लेखराज सकाळपासून रात्रीपर्यंत सोबतच असायचे, अशी माहिती त्यांचा मित्र सुनील नागरनं दिली. लखन आणि लेखराज दिवसभर सोबत असायचे. त्यांचं खाणंपिणं सोबतच असायचं. दोघांची मैत्री अतिशय घट्ट होती. आम्ही सोबत जगू आणि सोबतच मरू, असं दोघे म्हणायचे. त्यांचे हे शब्द खरे ठरले, असं नागरनं सांगितलं.
लखन आणि लेखराज दोघेही विद्यार्थी नेते होते. विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तिथेच दोघांची मैत्री झाली. राजगढमध्ये कुठेही जखमी अवस्थेत गोवंश आढळून आल्यास दोघेही तातडीनं तिथे पोहोचून उपचार करायचे. मात्र त्याच गोवंशाला वाचवत असताना त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.