भाजपच्या नेत्याने मागितली मद्रास न्यायालयाची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:56 AM2018-10-23T04:56:10+5:302018-10-23T04:56:18+5:30
भाजपचे केंद्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली आहे.
चेन्नई : भाजपचे केंद्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालावर अवमानजनक शेरा मारला होता. त्याची दखल घेऊ न कोर्टाने स्वत:हून अवमान केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली होती.
तामिळनाडूतील पुडुकोट्टई शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा मार्ग पोलिसांनी ठरवून दिला होता. संवेदनशील भागांतून मिरवणुका गेल्यास दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, एच. राजा यांना वेगळ्या मार्गाने गणेश मिरवणूक काढायची होती. तसे करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यावर त्यांनी तुम्ही हिंदूविरोधी आणि भ्रष्टाचारी आहात, असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे आम्ही मार्गात बदल करू शकत नाही, असे पोलीस अधिकाºयांनी त्यांना सांगितले. त्यावर एच. राजा यांनी काही शब्द वापरत उच्च न्यायालयाचाही अवमान केला होता. (वृत्तसंस्था)