मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:33 AM2019-06-12T11:33:11+5:302019-06-12T11:33:22+5:30
वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
नवी दिल्लीः वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामचा उल्लेख करत आझम खान म्हणाले, मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर सारखे लोक जन्माला येत नाहीत. एएनआयच्या वृत्तानुसार, मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदींच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला आझम खान यांनी उत्तर दिलं आहे. आझम खान म्हणाले, मदरशात नथुराम गोडसेच्या स्वभावाची माणसं अन् प्रज्ञा ठाकूरसारख्या व्यक्ती जन्माला येत नाहीत. दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या लोकांचं उदात्तीकरण होऊ शकत नाही.
2008मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर जामिनावर बाहेर आहेत. गेल्याच वर्षी भोपाळमधून भाजपाच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत. प्रचारादरम्यानही त्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. ज्यात त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. आझम खान यांच्या मते, केंद्राला खरोखरंच मदरशांना मदत करायची असल्यास त्यात सुधारणा करावी लागेल.
Azam Khan, SP: Religious teachings are imparted at madrasas. At the very same madrasas, English, Hindi & Maths are taught. This has always been done. If you want to help, improve their standard. Build buildings for madrasas, provide them furniture & midday meal facility. (11.06) pic.twitter.com/ElxM5c7Crl
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2019
उत्तर प्रदेशमधल्या रामपूरच्या मतदारसंघातील एसपी नेत्यानं सांगितलं की, मदरशांमध्ये धार्मिक शिक्षा दिली जाते, तिथे इंग्रजी आणि हिंदी, गणिताचेही धडे शिकवले जातात. हे नेहमीच होत असतं. त्याचा स्तर सुधारला पाहिजे. मदरशांना इमारत बांधून द्या, त्यांना फर्निचर आणि मिड-डे मिल उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं मतही आझम खान यांनी व्यक्त केलं आहे.