बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:40 AM2019-03-07T05:40:33+5:302019-03-07T06:50:09+5:30
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र त्या जागी असलेल्या मदरसा संकुलात आजही सहा इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने उच्चप्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केला आहे.
भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ४ मार्च रोजी अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेची छायाचित्रे टिपली आहेत. बालाकोटमध्ये हल्ला झाला त्या ठिकाणची उपग्रहाद्वारे काढलेली उच्चप्रतीची छायाचित्रे आजवर सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. प्लॅनेट लॅब्जने उपग्रहाद्वारे या जागेची ७२ सेमी इतक्या जवळून छायाचित्रे काढली आहेत. रॉयटर्सने म्हटले आहे की, या जागेच्या एप्रिल महिन्यात व आता काढलेल्या छायाचित्रांत तेथील स्थितीत फारसा फरक पडल्याचे निदर्शनास आलेले नाही. बॉम्बहल्ल्यांमुळे मदरसा संकुलात असलेल्या इमारतींचे नुकसान झाले आहे, भिंती पडल्या आहेत, आजूबाजूची झाडे कोसळली आहेत अशा कोणत्याही खाणाखुणा या छायाचित्रांत आढळून आल्या नाहीत.
>नुकसानाबाबत संभ्रम कायम
बालाकोटमधील हल्ल्यात किती दहशतवादी मारले याबद्दल मोदी सरकारने मौन पाळले आहे. हा आकडा सांगण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनीही नकार दिला होता. मात्र या हल्ल्यात २५० दहशतवाद्यांना मारण्यात आले असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच केला. केंद्रातले काही मंत्री हा आकडा ३५० असल्याचे खासगीत सांगत होते. हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, किती दहशतवाद्यांना मारले याचे पुरावे देण्याची मागणी ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. त्या साऱ्या गोंधळात आता रॉयटर्सच्या वृत्तामुळे आणखी भर पडली आहे.