मॅगीला क्लीन चिट नाहीच
By admin | Published: January 14, 2016 01:36 AM2016-01-14T01:36:16+5:302016-01-14T01:36:16+5:30
सर्वोच्च न्यायालयाने अजूनही मॅगीला क्लीन चिट दिली नसून मॅगी नूडल्समधील शिसे आणि ग्लुटामिक अॅसिडचे प्रमाणही कायदेशीर मर्यादेत आहे की नाही याचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजूनही मॅगीला क्लीन चिट दिली नसून मॅगी नूडल्समधील शिसे आणि ग्लुटामिक अॅसिडचे प्रमाणही कायदेशीर मर्यादेत आहे की नाही याचे स्पष्टीकरण म्हैसूर येथील शासकीय अन्न चाचणी प्रयोगशाळेला मागितले आहे.
म्हैसूर प्रयोगशाळेकडून मिळालेल्या दोन पत्रांचे अध्ययन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला. याच प्रयोगशाळेने मॅगीच्या नमुन्यांमधील मोनोसोडियम ग्लुटामेटच्या (एमएसजी) प्रमाणाची चाचणी केली होती. मॅगीचे निर्माता नेस्ले इंडियाने मात्र हे प्रमाण अन्न सुरक्षा कायद्यानुसारच असल्याचा दावा केला होता. तर केंद्र सरकारने इतर सर्व मानकांच्या सर्वंकष अध्ययनाची गरज व्यक्त केली होती. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने कुठलाही अंतरिम आदेश देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करून यासंदर्भात स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांचाही या पीठात समावेश आहे.
पीठाने सांगितले की, आम्ही चाचणी अहवालांचे अध्ययन केले आहे. त्यानुसार केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, म्हैसूरने न्यायालयाला दोन पैलूंबाबत सविस्तर माहिती द्यावी. एक म्हणजे शिशे आणि ग्लुटामिन अॅसिडचे प्रमाण मंजूर मापदंडानुसार आहे काय आणि दुसरे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नियमांचे त्यात पालन झाले आहे?
प्रयोगशाळेला अतिरिक्त नमुन्यांची गरज भासल्यास संबंधित विभागाकडे त्याची मागणी करता येईल, अशी मुभाही न्यायालयाने दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पीठाने आठ आठवड्यांचा कालावधी दिला असून पुढील सुनावणी ५ एप्रिलला होईल. न्यायालयाने गेल्या वर्षी १६ डिसेंबरला मॅगी नुडल्सच्या नमुन्यांची म्हैसूर येथील प्रयोगशाळेत चाचणीचे निर्देश दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)