पुण्याच्या विकास आराखड्यात महाघोटाळा - राधाकृष्ण विखे पाटील
By admin | Published: February 17, 2017 03:59 PM2017-02-17T15:59:36+5:302017-02-17T17:12:03+5:30
पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले़
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पुण्यात आले असताना काँग्रेस भवनमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, पुण्याचा विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण कोणत्या पुढारी, बिल्डरच्या सांगण्यावरुन बदल करण्यात आला. हा विकास आराखडा बिल्डरांनी तयार केल्याचे सांगितले जात आहे़ येथील वाड्यांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात भाजप सरकारने पुणेकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे. मागील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेहजार कोटींची घोषणा केली होती़ त्यापैकी ६ रुपयांचीही तरतुद केलेली नाही. नुकतेच ते पुण्यात येऊन गेल्याचे समजले. पण कोणतीही घोषणा केली नाही, याचे आश्चर्य वाटतंय. भाजपने पुणेकरांना गृहीत धरण्याचे काम केले आहे. पुणेकरांनी त्यांना २ खासदार, ८ आमदार निवडून दिले. त्यांचे पुण्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात पुण्याला केवळ १९ लाख रुपये मिळाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
शैक्षणिक हब व माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक झाला हा या २ वर्षात झालेला नाही. आज जगात पुण्याचे जे नाव घेतले जाते़ त्याचे शंभर टक्के श्रेय हे काँग्रेसला असल्याचे सांगून विखे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचा सरकार म्हणून काय भूमिका आहे, हे लोकांना ऐकायचे होते़ पण, त्या दोघांकडे कुठलाही अजेंडा नाही़ गेल्या २५ वर्षात इतक्या निचांकी पातळीवर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी प्रचार नेल्याचे आपण पाहिले नव्हते़ हे महाराष्ट्राचे दुदैव आहे़ २ -३ ग्लास पाणी पिऊन मुख्यमंत्री शिवसेनेची औकात काढत आहेत़ येत्या २३ तारखेला जनता त्यांना त्यांची औकात दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले़
अशी ही बनवाबनवी
काही वर्षांपूर्वी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता. त्यात दोघांनी अफलातून अभिनय केला होता़ त्यांना या दोघांनी मागे टाकले आहे. अशोक आणि सचिनाच्या जागी देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे आता फोटो छापावे लागतील, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.