Maha Kumbh 2025 : "हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटतोय", करुणानंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:58 IST2025-02-03T11:58:09+5:302025-02-03T11:58:45+5:30
Maha Kumbh 2025 : महाकुंभाच्या संदर्भात संतांपेक्षा सरकार आणि प्रशासनाबद्दल जास्त चर्चा होत आहे, यावर करुणानंद गिरी महाराजांनी आक्षेप घेतला.

Maha Kumbh 2025 : "हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटतोय", करुणानंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी
Maha Kumbh 2025 :प्रयागराज : आज महाकुंभातील वसंत पंचमीचे तिसरे अमृत स्नान आहे. ब्रह्ममुहूर्तावर सर्व संत आणि आखाडे एकामागून एक संगमावर स्नानासाठी पोहोचले. गेल्यावेळी मौनी अमावस्येला भाविकांच्या चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेतून धडा घेत प्रशासनाकडून यावेळी भाविकांना अतिशय पद्धतशीर पद्धतीने संगमावर स्नान करण्याची परवानगी दिली जात आहे.
दरम्यान, आवाहन आखाड्याचे महामंडलेश्वर करुणानंद गिरी महाराज यांनी महाकुंभमेळ्याबाबत एक मोठे विधान केले आहे. अमृत स्नानासाठी जाताना करुणानंद गिरी महाराज यांनी एबीपी न्यूज वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी, "मला हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटत आहे", असे करुणानंद गिरी महाराज म्हणाले.
करुणानंद गिरी महाराज यांनी महाकुंभाच्या प्रचाराबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "मला हा महाकुंभ आहे, असं वाटत नाही. पण हा मोदी आणि योगी कुंभ जास्त वाटत आहे. हा संपूर्ण १४४ वर्षांपासूनचा एक महापर्व आहे. या कुंभमेळ्याची व्यवस्था मोदी आणि योगी यांनी केली, परंतु येथील प्रशासन आणि या लोकांनी साधू-संताना बाजूला केले आणि महाकुंभाचे वैभव नष्ट करून स्वतःबद्दल अधिक दाखवून दिले आहे."
महाकुंभाच्या संदर्भात संतांपेक्षा सरकार आणि प्रशासनाबद्दल जास्त चर्चा होत आहे, यावर करुणानंद गिरी महाराजांनी आक्षेप घेतला. दरम्यान, आज वसंत पंचमीचे अमृत स्नान आहे. यानिमित्ताने, त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी भाविक सकाळपासूनच येत आहेत. यावेळी येथील व्यवस्था चांगली करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी मौनी अमावस्येला दुसऱ्या अमृत स्नानादरम्यान महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आता तिसऱ्या अमृत स्नानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.