कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी १.५ कोटी भाविकांचे पवित्र स्नान, शंखध्वनीने झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:43 IST2025-01-14T06:05:39+5:302025-01-14T06:43:47+5:30
Maha Kumbh 2025 : जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनाला लाखो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ; ४५ दिवसांत ४० कोटी भाविक येण्याची शक्यता

कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी १.५ कोटी भाविकांचे पवित्र स्नान, शंखध्वनीने झाली सुरुवात
- राजेंद्र कुमार
Maha Kumbh 2025 : महाकुंभ नगर (उत्तर प्रदेश): जगातील सर्वात मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभ मेळ्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. प्रयागराज येथे संगमस्थळावर नद्यांच्या पापकर्मापासून मुक्ती, तसेच मोक्ष मिळविण्याच्या इच्छेने सुमारे १.५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. हा मेळा सुमारे ४५ दिवस चालणार असून, त्या कालावधीत तिथे देश-विदेशातून ४० कोटी लोक येण्याची शक्यता आहे.
दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. १४४ वर्षापूर्वीच्या महाकुंभ मेळ्यात जशी ग्रहस्थिती होती, अगदी तशी स्थिती यंदाच्या वर्षी असल्याचे साधुसंतांचे मत आहे. 'पौष पोर्णिमेच्याच्या दिवशी शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात या प्रसिद्ध मेळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ साधुसंतांनी जय गंगा मैय्या अशा घोषणा देत पवित्र स्नान केले. १३ आखाड्यांचे साधू महाकुंभमेळ्यात आले आहेत.
'हर हर महादेव', 'जय गंगा मय्या'चा गजर
प्रयागराज येथील संगमावर स्नान करताना लोक 'जय श्री राम, हर हर महादेव आणि जय गंगा मध्याच्या घोषणा देत होते. देशभरातील विविध संप्रदायांतील लोक प्रयागराजच्या विविध घाटांवर पवित्र स्नान करताना दिसत होते. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथील कैलाश नारायण शुक्ला है भाविक म्हणाले की, महाकुंभ मेळ्यामध्ये भक्तांसाठी उत्तम व्यवस्था केली आहे.
'हा श्रद्धा, भक्ती व संस्कृतीचा सोहळा'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सोमवारी प्रारंभ झाला. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या या पवित्र सोहळ्यात असंख्य लोक सामील होतात. महाकुंभ मेळा भारताच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे, विविधतेतील एकतेचे दर्शन मेळ्यातून होत आहे.
पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून आले हजारो विदेशी नागरिक
पवित्र स्नान करण्यासाठी लोटलेल्या लाखो लोकांमध्ये विदेशी नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. अमेरिकी लष्करातील माजी सैनिक व आता बाबा मोक्षपुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबाचे भरणपोषण तसेच करिअर घडविणे, या गोष्टी करण्यात आल्या. इतरांप्रमाणे मीही मग्न होतो. पण, जीवनात काहीही शाश्वत नाही, असे मला एका क्षणी वाटू लागले. त्यानंतर मी मोक्षाच्या शोधात निघालो.
तरुण साध्वीचा व्हिडीओ चर्चेत
महाकुंभात दिसायला अतिशय सुंदर आणि तरुण असणाऱ्या साध्वीचा व्हिडीओ चर्चेत आहे. या साध्वीचे नाव हर्षा रिचारिया आहे. ती ३० वर्षांची आहे, ती उत्तराखंडची आहे. तिने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली आहे. आत्मिक शांतता मिळावी म्हणून तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मुलाखत घेणाऱ्या एका युट्यूबरने भलताच प्रश्न विचारल्याने एका साधूने त्याला चिमट्याने मारल्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
महात्मा गांधींनी संगमामध्ये केले होते पवित्र स्नान
प्रयागराजच्या क्षेत्रीय कार्यालयातील अभिलेखागारातील माहितीनुसार, १९१८ साली आयोजिलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये महात्मा गांधी यांनी पवित्र स्नान केले होते. त्यावेळी त्यांनी साधूसंतांशी संवाद साधला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही एकदा प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली होती.