आयआयटीयन बाबांच्या 'या' २ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; स्वतःच सांगितली संपूर्ण गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:12 IST2025-01-17T12:12:15+5:302025-01-17T12:12:44+5:30
Abhay Singh : आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. पण लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वतःला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे.

आयआयटीयन बाबांच्या 'या' २ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; स्वतःच सांगितली संपूर्ण गोष्ट
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत आणि ऋषी आले आहेत. य़ातील अनेक बाबा खूप लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये आयआयटीयन बाबा अभय सिंह यांचंही नाव आहे. त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. पण लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वतःला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे. बाबांनी दावा केला की, त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी स्वतः यापैकी दोन गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना, आयआयटीयन बाबांनी त्यांच्या भविष्यवाणींचा उल्लेख केला आणि सांगितलं की, त्यांनी क्रिकेटपटू सूर्य कुमार यादव आणि बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश या दोघांबाबत दोन भविष्यवाणी केल्या होत्या. वर बसलेले महादेव हे सर्व घडवून आणतात, ते आपल्याला दिशा दाखवतात आणि आपण सर्वजण ते करत राहतो.
"मी तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला विचित्र वाटतील. जसं की जेव्हा भारताचा वर्ल्ड कप होत होता.....टी-२० वाला, वन डे मध्ये माझं कोणीही ऐकलं नाही. मी म्हणालो की, सूर्य कुमार यादव... चला याला स्टार बनवूया, तो सेंच्युरी करेल, तेव्हा मध्येच शेजारी एक डॉक्टर आले आणि त्यांनी त्यावेळी ब्रेक केलं."
"गुकेशची बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती. म्हणून मी पाहिले की ही चाल अशी चालू आहे... ती अशी अशी करावी लागेल... म्हणून मी सुरुवातीला व्हिज्युलायजर करण्याची टेक्निक चालवली. मी हे सर्व माझ्या समजुतीने करत नाही... सर्व गोष्टींचं ज्ञान नेहमीच वरून मिळतं. मी खाली असलेल्या जगात आहे. ... महादेव सर्वांपेक्षा वर आहेत. ते सगळं पाहत आहेत. जसं नेव्हिगेशन चालतं, इकडे जा, तिकडे जा... जसं बोललं जातं तसं फॉलो करा" असं म्हटलं आहे.
आयआयटीयन बाबा हे हरियाणाचे रहिवासी आहेत. त्यांचं खरं नाव अभय सिंह आहे. त्यांनी आयआयटी मुंबई येथून डिग्री घेतली आहे. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत लाखो रुपयांची नोकरीही मिळाली. पण या सगळ्यात त्यांना रस नव्हता. नंतर सर्व इच्छा सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला.