ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:35 IST2025-01-22T19:33:02+5:302025-01-22T19:35:03+5:30
Maha Kumbh: येत्या 26 जानेवारीला साधू-संतांच्या उपस्थितीत वैदिक रितीरिवाजांनुसार या दोघांचे लग्न होणार आहे.

ही अनोखी गाठ..! भारताचा सिद्धार्थ अन् ग्रीसची पिनेलोपी, कुंभमेळ्यात होणार शाही विवाह
MahaKumbh 2025: पवित्र त्रिवेणी संगणावर वसलेल्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. म्हणूनच, या पवित्र महाकुंभात भारतासह जगभरातून भाविक येत आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका तरुणाने या पवित्र महाकुंभातून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ नावाचा तरुण कुंभमेळ्यात लग्नबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे, त्याची होणारी पत्नी ग्रीस देशाची रहिवासी आहे. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक साधू-संत लग्नात हजेरी लावणार आहेत.
पवित्र त्रिवेणी संगमाचे स्थान सृष्टीचा केंद्रबिंदू असून, धर्म आणि अध्यात्माचा प्रवाह येथूनच उगम पावतो, हे वास्तव सर्वश्रुत आहे. येथे देवीदेवतांचा वास आहे, अशी शास्त्रीय धारणा आहे. त्यामुळेच या पवित्र ठिकाणीया जोडप्याने लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 26 जानेवारी रोजी सिद्धार्थ आणि पिनेलोपी विवाहबंधनात अडकणार आहेत.
ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांच्या शिबिरात होणार विवाह
गंगा-यमुना आणि सरस्वतीसह सर्व देवांना साक्षी मानून 26 जानेवारीला जुना आखाड्यातील ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांच्या शिबिरात वैदिक पद्धतीने विवाह होणार आहे. या सोहळ्याला अनेक साधू-संतांची उपस्थिती असणार आहे.
मैत्रीचे रुपांतर अचानक प्रेमात
अथेन्स, ग्रीस येथील रहिवासी असलेल्या पिनेलोपीने सांगितले की, तिने पर्यटन व्यवस्थापनात पदवी घेतली आहे. यानंतर तिचा योगाकडे कल वाढला. पुढे तिने योगाचे शिक्षण घेतले आणि आपल्या देशात योग शिकवायला सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षांपूर्वी तिची आणि सिद्धार्थ खन्नाची दिल्लीत भेट झाली. सिद्धार्थदेखील योगा शिकवतो. त्यांच्यात सुरुवातीला मैत्री झाली आणि हळुहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. वर्षभरापूर्वी या दोघांनी जुना आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांची भेट घेतली. यानंतर पेनेलोपचा अध्यात्माकडे कल वाढला आणि तिने यांनी स्वामी यतींद्रानंद यांच्याकडून दीक्षा घेतली.
कुंभमेळ्यापूर्वी
पिनेलोपीआणि सिद्धार्थ यांनी स्वामी यतींद्रानंद यांच्याकडे कुंभमेळ्यात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वामींनीही त्यांना होकार दिला. आता 26 जानेवारीला या दोघांचा विवाह वैदिक रितीरिवाजांनुसार होणार आहे.