महाकुंभसंदर्भात सर्वाधिक गूगल सर्च करतोय पाकिस्तान; यूएई, कतारबाबतही मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 09:22 IST2025-01-15T09:20:20+5:302025-01-15T09:22:45+5:30
...यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सनातन संस्कृतीच्या वाढत असलेल्या प्रभावाचे दर्शन होते.

महाकुंभसंदर्भात सर्वाधिक गूगल सर्च करतोय पाकिस्तान; यूएई, कतारबाबतही मोठा खुलासा!
आता महाकुंभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक उत्सव बनला आहे. तीर्थराज प्रयागराज येथे सोमवारी महाकुंभाचा अर्थात कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ झाला. येथे इंग्लंड, अमेरिका, ब्राझील, जर्मनी, जापान आणि स्पेन सारख्या देशातून भाविक येत आहेत. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सनातन संस्कृतीच्या वाढत असलेल्या प्रभावाचे दर्शन होते.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानसह अरबस्थानातील इस्लामिक देशही कुंभमेळ्यात रस घेत असल्याचे दिसत आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ इस्लामिक देशांमध्ये जबरदस्त सर्च होत आहे. कुंभमेळा सर्च करणाऱ्या देशांच्या यादीवर एक नजर टाकली असता पहिले नाव पाकिस्तानचे दिसते. येथील लोक कुंभमेळा आणि तेथे जमलेल्या लोकांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर सर्च करत आहेत.
यूएई आणि कतार घेतायत रस -
पाकिस्ताननंतर, कतार, यूएई आणि बहरीन सारखे देशही कुंभमेळ्यात रस घेताना दिसत आहेत. याशिवाय, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड आणि अमेरिकेसारख्या देशांतील लोकही कुंभमेळ्यासंदर्भात सर्च करत आहेत आणि वाचत आहेत.
परदेशातील लोकही करतायत कुंभमेळ्यात स्नान -
कुंभमेळ्यात येणाऱ्या परदेशी यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेता, जगावर सनातन संस्कृतीचा प्रभाव वेगाने पडत असल्याचे दिसते. संगमात स्नान करणारे भारतीयच नाहीत, तर परदेशातून येणारे लाखो भाविकही या दिव्य अनुभवाचा भाग होत आहेत. संबंधित अहवालावरून दिसून येते की, २०२५ चा कुंभमेळा संपूर्ण जगाला पुन्हा एकदा भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सनातन सभ्यतेचे, धर्माचे अद्भुत शक्तीचे दर्शन घडवत आहे.
महाकुंभमेळ्यात ३.५० कोटी भाविकांनी केले अमृतस्नान -
जगातील सर्वात मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांतीला विविध आखाड्यांच्या साधूसंतांनी त्रिवेणी संगमावर पहिले अमृतस्नान केले. या ठिकाणी मंगळवारी तब्बल ३.५० कोटी भाविकांनी स्नान केले. महाकुंभातील सर्वात पहिले पवित्र स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी पार पडले. विविध आखाडे तसेच हिंदू धर्मातील विविध संप्रदायातील लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्यात स्नान केले. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभु पंचायती अटल आखाड्याच्या सदस्यांनी सर्वात पहिल्यांदा अमृतस्नान केले.