महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ -पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 05:53 IST2024-12-14T05:52:56+5:302024-12-14T05:53:08+5:30
प्रयागराज येथे उभारणार ५५०० कोटींचे विकास प्रकल्प

महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ -पंतप्रधान नरेंद्र मोदी
- राजेंद्रकुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रयागराज : महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ असून त्यामुळे देशाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सांगितले. विविध विकास प्रकल्पांच्या मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी एका जाहीर सभेमध्ये ते म्हणाले की, जातीपाती, पंथ हे सगळे भेद महाकुंभमेळ्यामध्ये विसरले जातात.
प्रयागराज येथे पुढील वर्षी महाकुंभ मेळा भरणार असून त्यासाठी १६७ महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे मोदी यांनी शुक्रवारी भूमिपूजन केले. या प्रकल्पांसाठी ५५०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. तिथे झालेल्या जाहीर सभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्यासाठी कलशाची स्थापना केली. तसेच गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली व कलश स्थापित केला.
महाकुंभ मेळ्याच्या आयाेजनामुळे देशात सकारात्मकतेचा प्रसार : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाकुंभ मेळ्यासारख्या गोष्टींच्या आयोजनामुळे देशात सकारात्मकतेचा प्रसार होतो. याआधीच्या सरकारांनी महाकुंभ मेळा अधिक उत्तम पद्धतीने व्हावा यासाठी कोणत्याही खास उपाययोजना केल्या नाहीत. मात्र, या मेळ्याचे धार्मिक व ऐतिहासिक रूप लक्षात घेता त्याचे आयोजन अधिक नेटक्या पद्धतीने व्हावे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. सुमारे ४५ दिवस चालणाऱ्या या मेळ्यामध्ये दररोज येणाऱ्या लाखो भाविकांसाठी योग्य त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
डिजिटल सुविधा देऊ : योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, २०१९ साली उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले होते. २०२५ साली होणारा मेळा हा भव्य होणार असून त्यात अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
विकास कामांची पाहणी
nहा महाकुंभ मेळा जिथे भरणार आहे त्या परिसरात हनुमान व अक्षयवट कॉरिडॉरचा विकास करण्यात येत असून त्या कामाच्या प्रगतीची त्यांनी पाहणी केली.
nमोदी यांनी जाहीर सभेत सांगितले की, काही हजार वर्षांपासून महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा मेळा म्हणजे कला, संस्कृतीचा अनोखा संगम आहे. साऱ्या विश्वात प्रयागराजला विशेष स्थान आहे. यंदाचा महाकुंभ मेळा जगभरात गाजणार आहे, असाही दावा माेदी यांनी केला.