जयपूरमध्ये सुरू झाला साहित्याचा ‘महा-कुंभ’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:02 AM2019-01-25T03:02:49+5:302019-01-25T03:02:58+5:30
विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!
- अपर्णा वेलणकर
डिग्गी पॅलेस, जयपूर : नोबेल-पुलीत्झर-मॅन बुकर अशा मानाच्या पुरस्कार विजेत्यांसह पाचशेहून अधिक वक्त्यांची सत्रे, पंधरा भारतीय आणि बारा आंतरराष्ट्रीय भाषांचे प्रतिनिधित्व, पर्यावरणापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत आणि कृत्रिम बुध्दिमत्तेच्या उदयापासून लोकशाही-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भविष्यापर्यंत अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल आणि पाच दिवसांत तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!
मराठी साहित्य संमेलनाच्या किडुकमिडुक संसाराची रडगाणी ऐकून किटलेले कान संपन्नतेच्या अभिजात स्वरांनी बहरून टाकणाऱ्या या लिट-फेस्टचे गुरुवारी सकाळी गुलाबी थंडीत डिग्गी पॅलेसच्या आवारात उद्घाटन झाले. ‘‘विज्ञान हे सर्वज्ञ, सर्वसाक्षी नव्हे, कारण त्याला भूत-वर्तमान-भविष्याची सांगड घालणारी प्रज्ञा अवगत नसते. म्हणून विज्ञानाने कला आणि संस्कृतीपुढे नम्र असले पाहिजे,’’ अशी मांडणी करणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर वेंकी रामकृष्णन यांच्या बीजभाषणाने या लिट-फेस्टचा प्रारंभ झाला.
या ‘साहित्य-कुंभा’चे हे बारावे वर्ष आहे. येत्या २८ जानेवारीपर्यंत चालणाºया या साहित्योत्सवासाठी उपस्थित राहणाºयांपैकी ७० टक्क्यांहून अधिकांचे वय तीस वर्षांच्या आतले आहेत.
इथे बड्या कंपन्यांनी स्वत:हून ओतलेला प्रायोजकत्वाचा पैसा आहे, त्याच्या उत्तम विनियोगाची दृष्टी आहे, राजकीय पुढाºयांना अतिरेकी महत्त्व देण्याची कारणे नाहीत.
>मोदी माझे शब्द खरे ठरवताहेत - थरूर
पंतप्रधान मोदींसाठी मी वापरलेले ‘पैरॉडॉक्सिकल प्राईममिनिस्टर’ हे शब्द खरे करून दाखवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे, त्याला माझा काय इलाज?- असा प्रश्न करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या सत्राच्या वेळी अचानक वादळी पाऊस सुरू झाला, तरी श्रोते जागचे हलले नव्हते!