बिहारच्या महाभारतात सासऱ्यांविरुद्ध उभे ठाकले जावई!
By admin | Published: September 28, 2015 11:38 PM2015-09-28T23:38:07+5:302015-09-28T23:38:07+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी तिकीट वाटपात मुलांना झुकते माप दिले पण जावयांना बाजूला सारले. त्यामुळे हे जावई आता बंडाळीच्या पवित्र्यात आहेत.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी तिकीट वाटपात मुलांना झुकते माप दिले पण जावयांना बाजूला सारले. त्यामुळे हे जावई आता बंडाळीच्या पवित्र्यात आहेत.
दिग्गज नेत्यांच्या या जावयांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून मुलांना तिकीट मग आम्हाला का नाही? असा सवाल त्यांनी आपल्या सासऱ्यांना विचारला आहे. जावयांच्या या मागणीवरून प्रामुख्याने लोक जनशक्ती पार्टी (लोजपा), राष्ट्रीय जनता दल (राजद)आणि हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम) हे पक्ष संकटात सापडले आहेत.
लोजपा प्रमुख रामविलास पासवान यांचे जावईद्वय अनिलकुमार साधु आणि मृणाल तिकीट मिळविण्यासाठी सासरेबुवांवर दबाव आणण्यात अपयशी ठरले आहेत. पत्ता कट झाल्याने साधु एवढे नाराज झाले की त्यांनी थेट सासऱ्यांसोबतच बंडखोरी करून खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीचा (जअपा) रस्ता धरला. मृणाल यांनी अद्याप पासवान अथवा लोजपाविरुद्ध वक्तव्य केले नसून ते कुठला पवित्रा घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
साधु यांनी जअपात सामील झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी उषा पासवान संयुक्त प्रचाराद्वारे लोजपाला नाकेनऊ आणू अशी धमकी दिली आहे. साधु त्यांचे साळे खा. चिराग पासवान यांच्यावरही फार नाराज आहेत. रामविलास पासवान यांनी त्यांचे बंधु खा. रामचंद्र पासवान यांचे पुत्र प्रिंस राज यांना कल्याणपूर मतदार संघातून पक्षाचे उमेदवार बनविले आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे जावई देवेंद्र मांझी तिकीट न मिळाल्याने प्रचंड संतापले आणि जअपात सामील झाले. ते बोधगया येथून रिंगणात आहेत.
मांझी यांचा हम रालोआचा घटक आहे. विशेष म्हणजे देवेंद्र मांझी हे जीतनराम मांझी यांचे खासगी सचिव आहेत. आपले साळे संतोषकुमार सुमन यांना तुंबा(सु) मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळाले मग मला का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. समाजवादी पार्टी महाआघाडीपासून विभक्त झाल्यामुळे राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे जावई आणि सपा खासदार तेज प्रताप यांनीही नाराजी जाहीर केली आहे. महाआघाडीला धडा शिकविण्यासाठी सासऱ्याच्या पक्षातील उमेदवारांना पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला असून पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह ते प्रचारात उतरणार आहेत.
सासऱ्यांच्या पक्षामुळे नाराज जावयांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न जअपाने केला आहे. परंतु निवडणुकीनंतर हे बंडखोर जावई कुणाच्या बाजूने राहतात हे बघायचे आहे. (वृत्तसंस्था)