महाभारत ऐकविण्याचा प्रघात पडत आहे; लोकसभाध्यक्षांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 09:02 AM2024-08-03T09:02:31+5:302024-08-03T09:03:22+5:30
आजकाल येथे महाभारताच्या कथांचा उल्लेख अधिक वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी सभागृहात कोणाचेही नाव न घेता महाभारतावरुन टाेला लगावला. ते म्हणाले, आजकाल येथे महाभारताच्या कथांचा उल्लेख अधिक वाढला आहे.
सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी आयुष मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारताना रामायणातील एका घटनेचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी ही टिप्पणी केली. यावर काेणाचेही नाव न घेता बिर्ला म्हणाले, महाभारत सांगू नका, प्रश्न विचारा. आजकाल येथे महाभारताच्या कथा सांगण्याचा प्रघात पडत आहे.
दरम्यान, काॅंग्रेसच्या डीएनएमध्ये शेतकरी विरोध असल्याचा आरोप करत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यसभेत केला. आपल्या मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेला उत्तर देताना चाैहान म्हणाले की, काँग्रेस सदस्य रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शकुनीचा उल्लेख केला. शकुनी हे कपट आणि कपटाचे प्रतीक आहे. द्युतामध्ये शकुनीने विश्वासघाताने पराभूत केले होते आणि चक्रव्यूहमध्येही घेरावाने मारले गेले.