संतप्त द्रौपदीमुळे राज्यसभेत महाभारत
By admin | Published: March 17, 2017 12:54 AM2017-03-17T00:54:27+5:302017-03-17T00:54:27+5:30
महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवणाऱ्या रूपा गांगुलींनी राज्यसभेत रूद्रावतार धारण केल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला.
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवणाऱ्या रूपा गांगुलींनी राज्यसभेत रूद्रावतार धारण केल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी शून्यप्रहरात पश्चिम बंगालमधील बाल तस्करीकडे सभागृहाचे लक्ष वेधला.त्या म्हणाल्या की सभागृहात उपस्थित असलेल्या एक सदस्य व सभागृहाचे सदस्य नसलेले एक नेते यांचा उल्लेख पोलीस तपासात प्रमुख आरोपीने केला आहे.
पाटील यांचे विधान ऐकताच जोरदार आक्षेप नोंदवत भाजपच्या सदस्या रूपा गांगुली उसळून उठल्या. ‘मी इथे हजर आहे, सदर प्रकरणात मला बोलू द्या, मला बोलू दिले नाही तर सभापतींजवळ येउन मी बोलेन’ असे ओरडत त्या थेट उपसभापतींच्या आसनापर्यंत पोहोचल्या. उपसभापती कुरियन त्यावर म्हणाले, एकतर शून्य प्रहराच्या यादीत तुमचे नाव नाही. जो विषय पाटील यांनी मांडला त्यात तुमचा नामोल्लेख कुठेही नाही. त्यामुळे तुम्हाला बोलू देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवींनी गांगुलींना रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्यांनाही गांगुलींनी जुमानले नाही. पश्चिम बंगालमधे विमला शिशुगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांच्यावर बाल तस्करीचा आरोप राज्य सीआयडीने ठेवला आहे. चौकशीत चंदनाने आपण पूर्णत: निर्दोष असून, भाजपच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली व नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या सहकार्याने हे शिशुगृह आपण चालवतो. अटक करायचीच असेल तर सर्वांनाच करा, असे म्हटले होते.
देखो, देखो कौन आया है? हिंदुस्थानका शेर आया है!
गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आले तेव्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांना उद्देशून ‘देखो, देखो कौन आया है?, असा कुत्सित टोमणा एक सूरात मारला. स्वत: मोदी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु भाजपा सदस्यांनी तशाच एकसूरात ‘हिंदुस्थान का सेर आया है!, असे उत्तर देऊन विरोधकांना गप्प केले.
उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपाने
अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर मोदी प्रथमच राज्यसभेत आले होते. मोदी जेमतेम १५ मिनिटे राज्यसभेत बसले व सदस्यांकडून उपस्थित केले गेलेले केंद्रीय विद्यालयांमधील रिक्त जागा व देशात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याविषयीचे प्रश्न त्यांनी ऐकले.
लोकसभेत मंत्री गैरहजर
पंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला हजेरी लावली, पण लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला मात्र पंतप्रधानांसह एकही वरिष्ठ मंत्री किंवा भाजपाचा वरिष्ठ नेता हजर नव्हता. मोदी आणि स्वराज यांच्याखेरीज राजनाथ सिंग, अरुण जेटली, नितीन गडकरी असे कोणीही हजर नसल्याने सत्ताधारी पक्षाची पहिली रांग रिकामी होती. पहिल्या रांगेत बसणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हेही हजर नव्हते तर लालकृष्ण आडवाणी प्रश्नोत्तराचा तास संपताना येऊन स्थानापन्न झाले.