महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:14 AM2019-05-25T05:14:31+5:302019-05-25T05:14:36+5:30

अतिआत्मविश्वास नडला : सपा-बसपाची राजकीय खिचडी शिजली नाही

Mahaghai's experiment failed, BJP's strategy succeeded | महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून भाजपला उखडून फेकण्याच्या संकल्पातून स्थापन झालेल्या सपा-बसप-रालोद आघाडीला अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळाले. प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी कमीत कमी ६० जागा जिंकण्याची आशा आघाडीस होती. ती केवळ १५ जागा मिळाल्याने धुळीस मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजे आघाडीला अतिआत्मविश्वास नडला. भाजपच्या भक्कम रणनीतीमुळे राजकीय खिचडी शिजू शकली नाही.


मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब पाहता सपा-बसप-रालोद आघाडीचा प्रयोग अगदी अपयशी सिद्ध झाला. एकमेकांची मते मिळविण्याचा दावा करणाऱ्या सपा आणि बसपच्या मतांची टक्केवारी वाढण्याऐवजी घटली.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाला २२.३५ टक्के मते मिळाली होती. तो आकडा घटून १७.९६ टक्क्यांवर आला. गेल्या वेळी बसपला १९.७७ टक्के मते मिळाली होती, ती यंदा १९.२६ टक्क्यांवर आली. रालोदची स्थिती ५ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. एकही जागा दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला मिळाली नाही. मात्र मतांची टक्केवारी ०.८६ वरून १.६७ टक्क्यापर्यंत वाढली.
तसे पाहता आघाडी बसपसाठी लाभदायक ठरली. २०१४ मध्ये एकही जागा न मिळालेला हा पक्ष यंदा मात्र मतांची टक्केवारी घटूनही यशस्वी ठरला. यंदा बसपला १० जागांवर यश मिळाले. तर समाजवादी पक्षाला गेल्या वेळी असलेल्या ५ जागा राखत आनंद मानावा लागला. वरिष्ठ नेता शिवपाल सिंह यादव यांची नाराजी आणि स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्यामुळे सपाचे नुकसान झाले.


राजकीयविश्लेषक प्रा. बद्री नारायण यांच्या मते आघाडी अपयशी ठरण्याची अनेक कारणे आहेत. सपा-बसप-रालोद आघाडीला यादव, मुस्लीम आणि जाट मतदारांच्या हक्काच्या मतांवर किल्ला जिंकू, असा विश्वास होता. मात्र भाजप ओबीसीमधील विविध जातींची एकजूट करत आघाडीवर मात करण्यासाठी बारकाईने काम करत आहे, याचा पत्ताच या आघाडीच्या नेत्यांना लागला नाही.
अनेक छोट्या दलित जातींची मते अधिकतर भाजपच्या पदरात पडली. भाजपने या जातींना सरकारी योजनांशी जोडले. त्यामुळे या जातींमध्ये आशादायकता निर्माण झाली.
अन्य एक राजकीय तज्ज्ञ परवेज अहमद यांच्या मते महाआघाडी केवळ मायावती आणि अखिलेश यांच्यातच झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनाने एकत्र येऊ शकले नाहीत.

मायावतींकडून आभार; अखिलेश विचारमंथनात
बसपप्रमुख मायावती यांनी संभाव्य आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र सपाकडून त्याबद्दल ठाम बाब समोर आलेली नाही. मायावती निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदप्रमुख चौधरी अजित सिंह यांनी पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठेने आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी जीवापाड प्रयत्न केले. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, तर दुसरीकडे सपा विचारमंथनात गढली आहे. या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसह बैठक घेतली. निकालांचा आढावा घेतला.

Web Title: Mahaghai's experiment failed, BJP's strategy succeeded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.