श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 05:59 PM2024-10-18T17:59:34+5:302024-10-18T18:00:11+5:30
Ujjain News: शिवलिंगाचे संरक्षण आणि भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून महाकाल मंदिरातील गर्भगृह सर्वांसाठी बंद करण्यात आले आहे.
Shrikant Shinde Mahakaleshwar Mandr : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात नियमांचे उल्लंघन केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्नी आणि इतर काही जणांसह मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. गुरुवारी(17 ऑक्टोबर) सायंकाळी श्रीकांत शिंदे आपल्या कुटुंबासह शिवलिंगाजवळ बसून पूजा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाने मोडला नियम
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी श्रीकांत शिंदे कुटुंबासह महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले आणि पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंदिर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पीएसह उज्जैन जिल्ह्यातील एक भाजप आमदारही उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता गर्भगृहात दर्शनासाठी गेल्याचा दावा केला जातोय. महत्वाची बाब म्हणजे, महाकाल मंदिराचे गर्भगृह गेल्या वर्षाभरापासून भाविकांसाठी बंद आहे. भाविकांना दुरुनच बाबा महाकालचे दर्शन घ्यावे लागते.
काँग्रेसची जोरदार टीका
काँग्रेसने या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे. सत्तेच्या नशेत बुडालेले भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते स्वतःला देवापेक्षा मोठे समजत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने बाबा महाकाल मंदिराच्या गर्भगृहात पत्नी आणि अन्य दोन व्यक्तींसह प्रवेश करणे, हे नियमांचेच नव्हे, तर सुरक्षेचेही उल्लंघन आहे, अशी टीका मध्य प्रदेश काँग्रेसने केली. तसेच, काँग्रेसचे आमदार महेश परमार म्हणाले की, सर्वसामान्य भाविकांना दुरुनच दर्शन घ्यावे लागते, तर व्हीआयपी परवानगीशिवाय गर्भगृहात प्रवेश करतात. हे नियमांचे उल्लंघन तर आहेच, पण मंदिराच्या व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
गर्भगृह वर्षभरापासून बंद
शिवलिंगाच्या रक्षणासाठी आणि भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाकाल मंदिरातील गर्भगृह सर्वांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ मंदिराचे मुख्य पुजारी, आखाड्याचे संत-महंत आणि काही निवडक मंत्र्यांनाच गर्भगृहात प्रवेश देण्यात येतो. मात्र व्हीआयपींकडून या नियमाचे वारंवार उल्लंघन होत असल्याने मंदिर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिरात सामान्यांसाठी एक नियम अन् खास लोकांसाठी एक नियम का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
काय म्हणाले महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष?
महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, महाकालेश्वर मंदिरातील नियम सर्वांसाठी समान आहेत. कोणालाही गर्भगृहात जाऊन पूजा करण्याची परवानगी नाही. ज्यांना प्रोटोकॉल अंतर्गत परवानगी आहे, तेच प्रवेश करू शकतात. यामध्ये महामंडलेश्वर, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह ठराविक व्हीआयपींचा समावेश आहे.
का बंद केला प्रवेश?
महाकालेश्वर मंदिरात दररोज दोन लाखांहून अधिक भाविक येतात. अशा स्थितीत गर्भगृहाचे दर्शन घेणे सर्वांनाच अवघड झाले आहे. गर्भगृहात दर्शन सुरू असताना बाहेरून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे मंदिर समितीने गर्भगृहाचे दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. यापूर्वी 750 रुपयांची पावती घेऊन भाविकांना प्रवेश दिला जात होता.