लेह येथे विजय दर्डा यांना महाकरुणा पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:16 PM2022-07-29T14:16:03+5:302022-07-29T14:16:46+5:30
एमआयएमसीतर्फे देण्यात येणारा पुरस्कार भिक्खू संघसेना यांच्या हस्ते प्रदान
सुरेशभुसारी
लेह : लडाखमधील लेह येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे (एमआयएमसी) यंदाचा महाकरुणा पुरस्कार २०२२ लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना प्रदान करण्यात आला. एमआयएमसीचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना यांनी लेह (लडाख) येथे हा पुरस्कार प्रदान केला.
समाजात प्रेम व सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी करीत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो. यातून समाजात द्वेषाची भावना कमी व्हावी व प्रत्येकामध्ये प्रेम व करुणा या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर आणले होते. विजय दर्डा यांनी या माध्यमातून समाजापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जात सर्व धर्मांतील धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले आहे, अशा शब्दांत भिक्खू संघसेना यांनी विजय दर्डा यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भिक्खू संघसेना यांनी गौरवपत्र, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती विजय दर्डा यांना प्रदान केली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, एमआयएमसीचे उपाध्यक्ष व माजी आमदार सेरिंग संफेल प्रामुख्याने उपस्थित होते. भिक्खू संघसेना यांनी राजेंद्र दर्डा यांचाही सन्मानपत्र, भगवान गौतम बुद्धाची मूर्ती देऊन गौरव केला. यावेळी इटली, व्हिएतनाम व पूर्वोत्तर प्रदेशातून आलेल्या पाहुण्यांचेही स्वागत भिक्खू संघसेना यांच्याहस्ते करण्यात आले.
पुढील सर्व धर्म परिषद लेहमध्ये
विजय दर्डा यांनी भिक्खू संघसेना यांनी फुलविलेल्या परिसराची पाहणी केली. शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, दिव्यांगासाठी भिक्खू संघसेना करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. तसेच पुढील वर्षी सर्वधर्म परिषद लेहमध्ये भरवावी, अशी सूचना केली. ही सूचना भिक्खू संघसेना यांनी तत्काळ मान्य केली. कार्यक्रमाचे संचालन निधी मुथाने यांनी केले.
धार्मिक असहिष्णुता रोखणे आवश्यक -विजय दर्डा
n यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय दर्डा म्हणाले, समाज आज एका वेगळ्या संकटातून जात आहे. समाजात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे. या संकटाचा सामना करावयाचा असेल, तर सर्व धर्मांना एक व्यासपीठावर आणून समाजात सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
n माझ्या परीने मी काम करीत आहे. या कामाची दखल लेह येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरने घेतली. हा पुरस्कार पुढील कामासाठी मला प्रेरणा देईल. तसेच भिक्खू संघसेना यांनी लेहसारख्या भागात एका खडकाळ जागेवर जे नंदनवन फुलवून वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे, या कामाची तोड नाही. त्यांच्या कामाने प्रभावित झालो आहे, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.
मानवतेसाठी काम हाच खरा धर्म- राजेंद्र दर्डा
n यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे व भुकेलेल्यांना अन्न देणे हाच खरा धर्म आहे.
n या मानवतेच्या धर्माचे आचरण भिक्खू संघसेना करीत आहे. मानवतेसाठी काम करीत असलेल्या भिक्खू संघसेना यांच्या कार्याच्या पाठीशी नेहमीच ‘लोकमत’ उभा राहील.
n सर्व धर्म परिषदेचे आयोजन लेह येथे केल्यास मला आनंद होईल, असेही यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले.
पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले
n भिक्खू संघसेना यांच्या शाळांमध्ये लडाख परिसरातील अनेक वंचित विद्यार्थी शिक्षण घेतात; परंतु अनेकांना पैशाअभावी उच्च शिक्षण घेता येत नाही. ही अडचण भिक्खू संघसेना यांनी भाषणात सांगितली होती.
n याची दखल घेऊन विजय दर्डा यांनी यवतमाळ येथील
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळेल, अशी घोषणा केली.
n या घोषणेचे टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांनी व यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या विदेशी पाहुण्यांनी स्वागत केले.