महाकुंभात आले ‘टच बाबा’, फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा करतात दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:53 IST2025-01-28T15:53:06+5:302025-01-28T15:53:33+5:30

Mahakumbh 2025 : या बाबाकडे उपचार करण्यासाठी लोक रांगा लावतात.

Mahakumbh 2025: 'Touch Baba' arrives at Mahakumbh, claims to cure illnesses just by touching his hands | महाकुंभात आले ‘टच बाबा’, फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा करतात दावा...

महाकुंभात आले ‘टच बाबा’, फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा करतात दावा...

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभा देश-विदेशातून करोडो भाविक पोहोचले आहेत. शिवाय, देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध पंथाचे साधू-संतांसह काही स्वयंघोषित बाबा दाखल झाले आहेत. या बाबा लोकांची सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. याच बाबांमध्ये एक 'टच बाबा'देखील आले आहेत. 

महाकुंभ नगरच्या आखाडा सेक्टरमध्ये तुम्हाला पावलापावलावर विविध बाबा पाहायला मिळतील. दरम्यान, येथील स्वस्तिक गेटजवळ भाविकांची गर्दी दिसते. यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव दिसतो. कोणी डोकं धरून उभा आहे, कोणी पाय धरून उभा आहे, कोणी पोट धरुन उभा आहे. इथे येणारा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रासलेला आढळतो. या गर्दीत एका साध्या खुर्चीवर बसलेले बाबा अर्तत्राण दिसतात. हे बाबा फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा दावा करतात.

भुवनेश्वर, ओडिशा येथून महाकुंभासाठी आलेले बाबा अर्तत्राण आपल्याकडे दैवी कृपा असल्याचा आणि याद्वारे आजार बरे करण्याचा दावा करतात. बाबा प्रथम रुग्णाला त्याची समस्या विचारतात आणि नंतर त्या अवयवाला हात लावून बरा करण्याचा दावा करतात. मायग्रेन, सायटिका, मानसिक ताण यांसारखे आजार फक्त स्पर्शाने बरा केल्याचा दावा बाबाने केला आहे. 2011 पासून ते अशाप्रकारचे उपचार करत असून, आतापर्यंत 24 लाखांहून अधिक लोकांना ठीक केल्याचा बाबाचा दावा आहे.

ना औषध ना इंजेक्शन
बाबाचा दावा आहे की, त्यांचे मंत्र किरकोळ ते गंभीर आजार बरे करतात. यासाठी ते ना कोणते औषध देतात, ना कोणते इंजेक्शन देतात. विशेष म्हणजे, बाबा या सेवेसाठी एक रुपयाही घेत नाहीत. ते वैद्यकीय शास्त्राला आव्हान देत म्हणतात की, जर वैद्यकीय शास्त्राला हवे असेल, तर ते माझ्यावर संशोधन करू शकतात. मी चाचणीसाठी तयार आहे. या बाबाकडे येणारे रुग्णही ठीक झाल्याचे सांगतात. 

बाबाच्या दाव्याशी डॉक्टर असहमत 
बाबाच्या या टच थेरपीबद्दल डॉक्टर सहमत नाहीत. न्यूरो सर्जन डॉ. पंकज खेतान सांगतात की, मायग्रेन आणि न्यूरोशी संबंधित आजार बरे होण्यासाठी अनेक महिने लागतात. अशा स्थितीत वैद्यकीय शास्त्र असे दावे स्वीकारू शकत नाही. 

Web Title: Mahakumbh 2025: 'Touch Baba' arrives at Mahakumbh, claims to cure illnesses just by touching his hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.