"गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण आणि.…’’ महाकुंभवर टीका करणाऱ्यांवर योगींचा बोचरा वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:55 IST2025-02-24T18:55:18+5:302025-02-24T18:55:55+5:30
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

"गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण आणि.…’’ महाकुंभवर टीका करणाऱ्यांवर योगींचा बोचरा वार
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. योगी म्हणाले की, महाकुंभामध्ये ज्यांनी जे काही शोधलं ते त्यांना मिळालं. गिधाडांना मृतदेह मिळाले. डुकरांना घाण मिळाली आणि संवेदनशील लोकांना नात्यांचं सुंदर चित्र मिळालं, सज्जनांना सज्जनता मिळाली, व्यापाऱ्यांना धंदा मिळाला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था मिळाली. ज्यांची नियत जशी होती, दृष्टी जशी होती, त्यांना तसं मिळालं.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही महाकुंभबाबत म्हणालात की एका विशिष्ट्य जातीच्या व्यक्तीला महाकुंभामध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. आम्ही सांगितलं होतं की, जे लोक सद्भावनेने जात असतील ते जाऊ शकतात. मात्र जर कुणी दुर्भावनेने जात असेल, तर तो अडचणीत येईल. आम्ही लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ होऊ दिला नाही. समाजवादी पक्ष सत्तेत असताना त्यांच्या मुख्यमंत्र्याकडे कुंभचं व्यवस्थापन करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी एका बिगर-सनातनी व्यक्तीला कुंभचं प्रभारी बनवलं होतं.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे लोक महाकुंभवर सातत्याने टीका करत असतात. या लोकांची मानसिकता जगजाहीर आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचा विरोध करायचा असतो. हे वर्ष भारताच्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पण समाजवादी डॉ. आंबेडकर यांना कधीपासून सन्मान देऊ लागले हा प्रश्नच आहे. कन्नौज मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं, ते कुणी बदललं, हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी लगावला.