"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:53 IST2025-02-18T16:52:05+5:302025-02-18T16:53:21+5:30

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

mahakumbh is now mrityukmbh west bengal chief minister mamata banerjee controversial statement | "महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

Mamata Banerjee :  उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या महाकुंभमेळ्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत भाषण करताना म्हटले की, महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे. महाकुंभाच्या आयोजनासाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. तसेच, व्हीआयपी लोकांना विशेष सुविधा देण्यात आल्या, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी या २०११ पासून सतत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी  भाजप  सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

अलिकडेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याला फालतू म्हटले होते. लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी महाकुंभमेळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुंभ…कुंभ..कुंभ… कुंभला काही अर्थ नाही आहे. फालतू आहे कुंभ अशी टीका लाल प्रसाद यादव यांनी केली. 

लालू प्रसाद यादव यांच्या या वक्तव्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी राबडी देवी छठ करताना गंगेत डुबकी मारत नाहीत का, असा सवाल केला आहे. तसेच, त्यांचे कुटुंबीय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाहीत का? याच वर्षी त्यांचे लाखो अनुयायी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेले होते. लालू प्रसाद यादव यांनी या सर्वांचा अपमान केला.

याचबरोबर, महाकुंभमेळ्यातील व्हीआयपी कल्चरवरून अनेक विरोधी नेते योगी आदित्यनाथ सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. तसेच, धर्मग्रंथांमध्ये १४४ वर्षे जुन्या महाकुंभाचा उल्लेख नाही, असे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस शिव गोपाल यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आतापर्यंत ५५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. 

दोनदा चेंगराचेंगरी 
महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरी झाली आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. यानंतर, १५ फेब्रुवारीच्या रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
 

Web Title: mahakumbh is now mrityukmbh west bengal chief minister mamata banerjee controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.