महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:32 IST2025-02-04T17:31:56+5:302025-02-04T17:32:34+5:30
Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत.

महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा
Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनीदेखील महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत मोठा दावा केला.
महाकुंभ चेंगराचेंगरीवर संसदेत झालेल्या निदर्शनेनंतर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी दावा केला की, या घटनेनंतर 15,000 लोकांनी त्यांचे कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतेही अपडेट किंवा माहिती सरकार देत नसल्याबद्दल यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
15,000 बेपत्ता
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सपा खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर 15,000 लोकांनी आपले नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या. पण, सरकार याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. 1954 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बोलताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या सांगितली होती.
याउलट उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन व्हीआयपींसाठी व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्यांची चिंता अजिबात चिंता नाही. मुख्यमंत्री रोज कुंभमेळ्यात हजर असतात. सर्व अधिकारी व्हीआयपी लेनची देखभाल करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्य लोक मरतात, याची त्यांना फिकीर नाही, अशी टीकाही सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली.
विरोधकांची कारवाईची मागणी
सोमवारी विरोधकांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उधळून लावले. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी यूपी सरकारवर टीका केली आणि मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर न केल्याबद्दल सरकारला फटकारले. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) सदस्या सुलता देव यांनीदेखील मृत आणि बेपत्ता भाविकांचा डेटा शोधण्यात सरकारच्या असमर्थतेवर प्रश्न केला. तसेच, या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चेची मागणी केली.