आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:00 IST2025-02-12T20:00:35+5:302025-02-12T20:00:53+5:30

Mahakumbh Stampede : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Mahakumbh Stampede: 'We made a mistake...', DGP Prashant Kumar apologizes for the stampede in Mahakumbh | आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

Mahakumbh Stampede : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता याप्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांनी आपली चूक मान्य केली आहे. खुद्द उत्तर प्रदेशचे पोलीस प्रमुख डीजीपी प्रशांत कुमार यांनी ही चूक मान्य केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले की, आम्ही या चुकीपासून खूप काही शिकलो आणि चांगल्याप्रकारे गर्दी हाताळण्याचे काम केले. 

माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत डीजीपी प्रशांत कुमार माध्यमांशी बोलत होते. हे पाचवे स्नान असून आता महाशिवरात्रीचे स्नान बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. मौनी अमावस्येच्या दिवशी गर्दी व्यवस्थापनात एक छोटीशी चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला. त्या घटनेपासून धडा घेत उत्तर प्रदेश पोलीस अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी काम करत आहे. मौनी अमावस्येनंतरही दररोज करोडो लोक येथे येत आहेत, मात्र आता कुठेही अडचण आली नसल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे दररोज कोट्यवधी भाविक संगमात सुरक्षितरित्या स्नान करत आहेत. आतापर्यंत 46 ते 47 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. माघी पौर्णिमेनिमित्तही कोट्यवधी लोकांनी स्नान केले. महाकुंभाव्यतिरिक्त, गर्दी व्यवस्थापनाची पद्धत चित्रकूट, काशी विश्वनाथ मंदिर, विंध्याचलमधील विंधवासिनी मंदिर, अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातही अवलंबण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लखनौमध्ये वॉर रूम 
डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मंदिरांमध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी राजधानी लखनऊमध्ये एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममधूनच ठिकठिकाणी गर्दीची परिस्थिती आणि व्यवस्थापनाच्या पद्धती पाहिल्या जात आहेत. एकट्या महाकुंभात 2500 हून अधिक हाय रिझोल्युशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांमधून थेट फीड घेण्यात येत आहे. इतर मंदिरांमध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Mahakumbh Stampede: 'We made a mistake...', DGP Prashant Kumar apologizes for the stampede in Mahakumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.