७८ फुटी गणेशमूर्तीसाठी २९,४६५ किलोचा महालाडू
By admin | Published: September 8, 2016 06:17 AM2016-09-08T06:17:28+5:302016-09-08T06:17:28+5:30
गुजुवाका येथील ७८ फुटी गणेशमूर्तीसाठी २९,४६५ किलो वजनाचा महालाडू तयार करण्यात आला असून, जगातील सर्वात मोठा लाडू म्हणून त्याची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे
विशाखापट्टणम : गुजुवाका येथील ७८ फुटी गणेशमूर्तीसाठी २९,४६५ किलो वजनाचा महालाडू तयार करण्यात आला असून, जगातील सर्वात मोठा लाडू म्हणून त्याची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. हा बेसन लाडू तयार करण्यासाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च झाले आहेत.
तापेश्वरम येथील प्रसिद्ध पारंपरिक मिठाई भांडार श्री भक्तजानेया सुरूची फूडस्ने गणेशोत्सवानिमित्त हा महालाडू तयार केला असून, तो विशाखापट्टणमच्या गुजुवाका येथील विसाखा इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर असोसिएशनच्या गणेशमूर्तीसमोर नैवेद्य म्हणून ठेवण्यात आला आहे. ही गणेशमूर्ती ७८ फुटी आहे. श्री भक्तजानेया सुरूची फूडस्चे मालक पी. व्ही. व्ही. एस. मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की, या लाडूमध्ये ४५ टक्के साखर, २३ टक्के बेसन, २७ टक्के तूप आणि ५ टक्के सुकामेवा आहे. हा लाडू तयार करण्यासाठी २० जणांच्या टीमला २० तास लागले. बुधवारनंतर लगेचच या लाडूच्या प्रसादाचे भक्तांना वाटप सुरू होईल. जगातील सर्वात मोठा लाडू तयार करण्यात येण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी अंबाजी, गुजरात येथील आरुषी अंबाजी माता देवस्थान ट्रस्टने ११,११५ किलोचा लाडू तयार केला होता.