महाराणी जोधाबाई ही राजपूत नव्हे; तर पोर्तुगीज स्त्री होती!
By Admin | Published: April 5, 2017 04:40 AM2017-04-05T04:40:34+5:302017-04-05T04:40:34+5:30
मुगल बादशहा अकबराची माहाराणी आणि बादशहा शहाजहाँची आई म्हटले गेले ती महाराणी जोधाबाई हे काल्पनिक पात्र होते.
पणजी: जिला इतिहासात मुगल बादशहा अकबराची माहाराणी आणि बादशहा शहाजहाँची आई म्हटले गेले ती महाराणी जोधाबाई हे काल्पनिक पात्र होते. जोधाबाई अस्तित्वातच नव्हती. इतिहासकारांनी जिला जोधाबाई म्हटले ती जन्माने पोर्तगीज होती आणि तिचे नाव दोना मारिया मास्करेन्हास असे होते!
गोव्यातील ८१ वर्षांचे लेखक लुईस दे असिस कोरिआ यांनी ‘पोर्तुगीज इंडिया अॅण्ड मुगल रिलेशन्स १५१०-१७३५’ या पुस्तकात हा दावा केला आहे. हे पुस्तक ब्रॉडवे पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे.
कोरिआ लिहितात की, जिला जोधाबाई म्हटले गेले, ती पोर्तुगीज स्त्री होती. पोतुर्गीज जहाजांचा ताफा अरबी समुद्रातून जात असताना त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहादूरशहा यांच्या सैन्याने जहाजावरील इतरांसोबत दोना मारिया आणि तिची बहिण ज्युलियाना यांनाही ताब्यात घेतले. पुढे सन १५००च्या मध्यात सुलतान बहादूरशहाने या दोना मारियाला अकबरास भेटीदाखल ‘पेश’ केले.
कोरिआ यांनी सांगितले की, दोना मारिया मास्करेन्हास अकबराच्या दरबारात आली तेव्हा तिला पाहताच बादशहा तिच्या प्रेमात पडला. बादशहाने दोना मारियाचा स्वीकार केला आणि बहिण ज्युलियानासह तिला जनानखान्यात दाखल केले. आपल्यापैकी एका स्त्रीने मुगलांच्या जनानखान्यात राहावे हे पोर्तुगीज व कॅथॉलिक मंडळींच्या पचनी पडणारे नव्हते. दुसरीकडे, मुगलांशी पंगा घेणाऱ्या ख्रिश्चनांपैकी एका स्त्रीने शहेनशहाची बेगम म्हणून मिरवावे, हे मुगलांना पटणारे नव्हते. म्हणून ब्रिटिश व मुगल इतिहासकारांनी दोना मारियाला ‘जोधाबाई’ असे नाव देऊन ती राजपूत असल्याचे भासविले. स्वत: अकबर वा जहांगीर यांच्या लिखाणात जोधाबाई नावाच्या स्त्रीचा उल्लेख आढळत नाही, असेही लेखक म्हणतो.
इतिहासकार शिरीन मूसावी यांचा दाखला देत कोरिआ म्हणतात की, अकबरनामा वा समकालिन लिखाणात जोधाबाईचा उल्लेख नाही.
अकबराने कच्छावा वंशाच्या भा मल या राजपूत राजाच्या मुलीशी
विवाह केल्याचे उल्लेख जरून आढळतात, पण तिचे नाव जोधाबाई नव्हते. (विशेष प्रतिनिधी)
>जहांगीराच्या लिखाणाचे कोडे
कोरिआ लिहितात: जहांगीराने बादशहा झाल्यावर ख्रिश्चन आणि जेजुईट मिशनरींना उदारपणे आश्रय दिला यावरून तो कोणा राजपूत राणीच्या नव्हे, तर पोर्तुगीज महिलेच्या उदरी जन्मला असावा, याचे संकेत मिळतात.
आपल्या आठवणी लिहून ठेवणाऱ्या जहांगीराने आपल्या आईचा नावाने उल्लेख करू नये, हे खरोखरीच कोडे आहे. त्याची आई मुस्लीम किंवा हिंदू उच्चकुलीन नव्हती किंवा ती एक फिरंगी होती, म्हणून जहांगीराने तिचा उल्लेख मरियम-उल-जानी असा केला असावा का?
>... तर त्याने तसा उल्लेखच केला असता!
कदाचित दोना मारिया मस्कारेन्हास हीच जहांगीरची आई असावी. याच स्त्रीचा मुगलकालीन लिखाणात वरचेवर मरियम-उल-झमानी असा तर कधी जोधाबाई तर कधी हरकाबाई या नावाने उल्लेख आढळतो. मात्र मुगलकालिन बखरींमध्ये मरियम-उल-झमानीचा जहांगीरची आई असा उल्लेख आढळत नाही.कोरिआ म्हणतात की, अब्द-अल-कादिर, बदाऊनी आणि अबु-अल-फजल या मुगल बखरकारांनी जहांगीरच्या आईचा नावानिशी उल्लेख करू नये हे एक न उलगडलेले कोडे आहे. मुगल राजपुतांशी मैत्री करण्यास उत्सुक होते. स्वत:चा जन्म राजपूत राजघराण्यातील मुलीच्या पोटी झाला असता तर जहांगीराने तरी त्याचा अभिमानाने उल्लेख केला असता. पण तसे झाल्याचे दिसत नाही.