लोकसभेसोबतच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:23 AM2018-12-04T06:23:51+5:302018-12-04T06:24:04+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही होऊ शकते.
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही होऊ शकते. एकत्र निवडणूक घेणे सोयीचे असते. फडणवीस सरकारने विधानसभा काही महिने आधी विसर्जित केल्यास दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतील, असे संकेत निवडणूक आयोगातील सूत्रांनी सोमवारी दिले.
लोकसभेची मुदत मे २०१९ मध्ये तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्ये संपत आहे. एकत्र निवडणूक घेण्यासाठी राज्य विधानसभा पाच-सहा महिने लवकर विसर्जित करावी लागेल. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आले आहेत. त्यामुळे इतर कोणी तयार झाले नाही तरी आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये एकत्र निवडणुका घेण्याची ते सुरुवात करू शकतील.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण व मिझोरमचे निकाल पुढील आठवड्यात जाहीर झाल्यावर याविषयी स्पष्टता येऊ शकेल. त्यात भाजपाला यश मिळाले तर त्या लोकप्रियतेच्या लाटेचा फायदा घेऊन स्वत:कडे असलेली इतर राज्ये आपल्याकडेच ठेवण्याची खेळी भाजपा खेळू शकेल. त्यात फटका बसला तरी जनमत प्रतिकूल होण्याआधी लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका उरकण्याचे ते एक सबळ कारण असू शकेल.
आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम व अरुणाचल प्रदेशच्या विधानसभांची मुदत मे ते जून २०१९ दरम्यान संपत आहे. जम्मू-काश्मीरची विधानसभाही विसर्जित केली गेल्याने तेथेही पुढील सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागणार आहे. या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका लोकसभेसोबत घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.
>सात राज्यांत एकाच वेळी शक्य
महाराष्ट्र व हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा मुदतीआधी काही महिने बरखास्त करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतल्यास वरील पाचसोबत या दोन राज्यांमध्येही लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक सहजपणे घेतली जाऊ शकेल. निवडणुकीची तयारी आणि सुरक्षेचा बंदोबस्त यादृष्टीनेही एकत्र निवडणुका घेणे नेहमीच सोयीचे असते. अन्यथा काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा हीच सर्व व्यवस्था पुन्हा उभी करावी लागते, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.