दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 08:48 AM2024-10-30T08:48:35+5:302024-10-30T10:14:12+5:30
Maharashtra Assembly Election 2024: जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता असलेले श्रीनिवास वनगा हे रात्री उशिरा घरी परतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र घरी आल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेऊन ते पुन्हा निघून गेल्याचंही कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
पालघर येथून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे मंगळवारी दिवसभर नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता असलेले श्रीनिवास वनगा हे रात्री उशिरा घरी परतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र घरी आल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेऊन ते पुन्हा निघून गेल्याचंही कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारल्यानंतर धक्का बसलेल्या श्रीनिवास वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भावूक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे वनगा यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसेच पोलीसही त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रात्री उशिरा श्रीनिवास वनगा हे घरी परतले, अशी माहिती त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिली. प्रकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा हे सध्या विश्रांती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपामध्ये पालघरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने तिथून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी येथे श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. तसेच तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते.