Nitish Kumar: महाराष्ट्र आले बिहार गेले, नितीश कुमार यांनी असा केला फोडाफोडी करणाऱ्या भाजपाचा गेम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:39 PM2022-08-09T18:39:05+5:302022-08-09T18:39:20+5:30
Nitish Kumar: सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. ममता बँनर्जीसुद्धा ईडीच्या तपासामुळे अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार हे विरोधी पक्षांचे तगडे उमेदवार बनू शकतात.
पाटणा - बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली आहे. आता नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत आरजेडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये भाजपाचा गेम झाल्याचे दिसत आहे. एवढ्या घडामोडी घडत असताना भाजपा त्यापासून अनभिज्ञ कसा काय राहिला. बिहारमधील घडामोडींकडे भाजपानं दुर्लक्ष केलं की कुठलाच पर्याय नसल्याने जे घडतंय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपावर आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी राजकीय चर्चांचे केंद्र बनल्या होत्या. भाजपाने आपलं सगळं लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरावर केंद्रित केलं होतं. त्यातूनच भाजपाने एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला बळ दिलं. तसेच हे बंड यशस्वी करण्यास हातभार लावून एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं.
मात्र जेव्हा भाजपा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात गुंतला होता तेव्हाच बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या जेडीयूसोबत भाजपाचे खटके उडत होते. दोन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून मतभेद तीव्र होत गेले. अखेर तेच निमित्त करून नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली. मात्र जाणकारांच्या मते नितीन कुमार यांनी एका व्यापक रणनीतीनुसार भाजपाची साथ सोडली आहे. त्याची तयारी त्यांनी आधीच केली होती.
बिहारमधील एक ज्येष्ठ राजकीय पत्रकार कन्हैय्या भिलारी यांच्या मते ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. पंतप्रधानपद मिळवण्याची नितीश कुमार यांची महत्त्वाकांक्षा आहे, तसेच विरोधी पक्षही त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पाहत आहेत. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशभर फिरून प्रचार केला होता. तसेच नितीश कुमारही देशभर फिरून प्रचार करतील.
सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. ममता बँनर्जीसुद्धा ईडीच्या तपासामुळे अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार हे विरोधी पक्षांचे तगडे उमेदवार बनू शकतात.