“इंडिया म्हणजे भारत अन् भारत म्हणजे मोदी”; NDA बैठकीनंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:08 AM2023-07-19T00:08:01+5:302023-07-19T00:11:02+5:30
CM Eknath Shinde Join NDA Meeting: लोकांनी ठरवले आहे की, अब की बार फिर एक बार मोदी सरकार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
CM Eknath Shinde Join NDA Meeting: देशात ३३० प्लस अशा प्रकारचे वातावरण सगळीकडे आहे. असे चित्र सगळ्यांच्या सूचनांमधून आणि भाषणांमधून पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकू, असा दावा करताना इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजेच पंतप्रधान मोदी, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. NDAच्या बैठकीत सहभागी झालेले मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले.
ही लढाई आता केवळ पंतप्रधान मोदी यांची नाही. तर संपूर्ण देशाची लढाई आहे. ही भारताची लढाई आहे. कारण भारताला एवढ्या उंचीवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देश प्रगती करत आहे. आर्थिक आघाडीवर पुढे जात आहे. त्यामुळे लोकांनी ठरवले आहे की, अब की बार फिर एक बार मोदी सरकार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
आपल्या देशाची बदनामी दुसऱ्या देशात जाऊन करत आहेत
आपल्या देशाची बदनामी दुसऱ्या देशात जाऊन करत आहेत. त्यांचा एकच अजेंडा आहे. सगळे एकत्र आले होते, तरीदेखील एक नेता ठरवू शकले का, अशी विचारणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. देशाचा विकास हाच पंतप्रधान मोदी यांचा अजेंडा आहे. मात्र, विरोधकांचा अजेंडा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करणे, त्यांना शिव्या देणे आणि त्यांची बदनामी करणे हाच आहे. मात्र, देशातील जनता सूज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत जे काम केले, त्याची जाणीव लोकांना आहे. यापुढे देशाला पुढे न्यायाचे असेल, महासत्तेच्या दिशेने जायचे असेल, विकास करायचा असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, एनडीएच्या बैठकीत ३९ पक्ष होते. चांगली बैठक झाली. प्रत्येकाने आपली मते मांडली. एनडीएतील घटक पक्षांनी पंतप्रधान मोदींना खंबीर पाठिंबा दिला. आगामी लोकसभा निवडणुका सोबत लढणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ४५ जागा निवडून आणणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. अजित पवार यांनी सोबतच निवडणुकी लढविणार असल्याचे म्हटले आहे.