Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:59 AM2019-11-24T03:59:29+5:302019-11-24T07:06:23+5:30

महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's long-term plan successful; Prepare to replace Shiv Sena | Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

Next

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली -  महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप  यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. महाराष्ट्रातील आपण एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असे भाजपने आता दाखवून दिले आहे, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करण्यातही भाजपला यश आले आहे.

शिवसेना आपल्याबरोबर येत नसल्याचे पाहून भाजपने महाराष्ट्रात आपणच एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहोत, हे दाखवून देण्याची योजना आखली. हिंदुत्ववादी शिवसेननेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा फायदाच झाला. शिवसेनेला कदापि काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करू द्यायचे नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेत्याने ठरविलेच होते; पण उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राहिलेली नाही, हे दाखवून देणे भाजपला शक्य झाले. खा. संजय राऊ त यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार, असे जाहीर  करताच भाजपने आपले संख्याबळ वाढविण्यास सुरुवात केली. त्यासाठी अजित पवार यांची साथ मिळाली. ती साथ मिळण्याची कारणे सर्वज्ञात आहेत; पण राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करण्यासाठी आपल्याबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, असे निश्चित करण्यात आले. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे विरोधी पक्षात फूट पडल्याचे दाखवणे सोपे झाले.



विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करून हिंदुत्ववादी मतांचा फायदा भाजपने मिळवला होताच. ती झाली नसती, तर भाजपला शिवसेना व राष्ट्रवादीशी लढावे लागले असते. ते त्रासदायक ठरले असते. यापुढे मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीशी निवडणूक समझोता केला, तर हिंदुत्ववादी मते आपल्यालाच मिळतील, असे भाजपने नक्की करून घेतले आहे, याचे कारण त्या दोन्ही पक्षांची ठरलेली मते एकमेकांकडे वळू शकत नाहीत. शिवसेनेची मते आली, तर भाजपकडेच येऊ शकतात.

आणखी आमदार संपर्कात
पण देवेंद्र फडणवीस सरकार पाच वर्षे राहणार का? या प्रश्नावर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ही तर सुरुवातच आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही पक्षांच्या अनेक आमदारांना एकमेकांसोबत जाणे मान्य नाही. सरकार पडलेच, तर सत्तास्वार्थासाठी शिवसेनेने केलेले प्रयत्न आम्ही जनतेपुढे मांडू, शिवसेनेने जनतेचा कसा विश्वासघात केला, हे सांगू. त्याचा फायदा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

सतत बाळासाहेबांचे नाव घ्या
भाजपने आपल्या राज्यातील नेत्यांना सांगितले आहे की, शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर अवश्य टीका करा; पण ते करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कसे तत्त्वाचे राजकारण केले, हेही लोकांना समजावून सांगा. आता बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, तर आम्हीच हिंदूंचे रक्षण करू शकतो, हे आपण लोकांना सांगणे गरजेचे आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's long-term plan successful; Prepare to replace Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.