Maharashtra Government: महाराष्ट्र सदनातील सुरक्षा वाढवली, सामान्यांना प्रवेशास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:43 AM2019-11-24T03:43:16+5:302019-11-24T03:43:33+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली.
महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे विपरीत पडसाद राजधानीत उमटू नयेत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळपासूनच कमालीची वाढ करण्यात आली.
राज्यपाल व नायब राज्यपालांची दोनदिवसीय परिषद येथे सुरू आहे. त्यासाठी भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र सदनात राज्यपालांचा मुक्काम असताना सुरक्षाव्यवस्था असते. मात्र, आज सदनाच्या आत, परिसरात आणि मुख्य प्रवेशद्वारावरही सुरक्षारक्षक उभे आहेत. राज्यपालांचे दुपारी ४ वाजता सदनात आगमत होताच, तिथे सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला.
सदनातील कर्मचाऱ्यांसह मोजक्या लोकांना आत सोडले जात आहे. मुख्य प्रवेशद्वारासह सदनातून बाहेर पडणा-याचा मार्ग आणि फरिदकोट लेनच्या दिशेने असलेल्या फाटकावरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आतील लोकांचीही तपासणी
राज्यपालांचा आणखी दोन दिवस दिल्लीत मुक्काम असणार आहे. तोपर्यंत तिथे प्रवेश मिळणे अवघड होईल. ज्यांचा आधीपासून सदनात मुक्काम आहे, त्यांचीही कसून तपासणी केली जात आहे.