सेक्युलॅरिझमबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान, मांडली अशी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 10:41 AM2019-11-21T10:41:29+5:302019-11-21T10:42:46+5:30
कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.
नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा झाली असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. सेक्युलर हा शब्द घटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कुणाचेहा काम करताना जात धर्म पाहिले जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सेक्युलॅरिझमूबाब बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ‘’आपल्या देशाच्या घटनेमध्ये सेक्युलर हा शब्द समाविष्ट आहे. आपली घटना सेक्युलर या शब्दावर आधारित आहे. येथे जात धर्म पाहून काम केले जात नाही. रोजगार देताना तसेच इतर कामे करताना भेदभाव केला जात नाही . महाराष्ट्र्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना एकत्र घेऊन रा्ज्य केले होते. त्यांचे राज्य हे सर्व धर्माच्या लोकांना आपले वाटत असे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा न्यायालयामध्ये कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास लावण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास लावावी, असा विचार मांडला होता. त्यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक काही बोलले पाहिजे, असे मला वाटत नाही.
दरम्यान, राज्यातील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ‘’सरकार स्थापन करण्या्संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा झाली आहे. काल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आता पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.’’
‘’राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मी आज पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटणार आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात सत्तावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच सध्यातरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे न झालेल्या चर्चांवर मी बोलणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी आमची इच्छा आहे.’’असे संजय राऊत यांनी सांगितले.
तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत सध्या दिल्लीत सुरू झालेल्या चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता सत्तास्थापनेबाबतचे यापुढील निर्णय हे मुंबईतून होतील. तसेच सरकार कधी स्थापन होईल आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी या वेळी केले.