Maharashtra Government: शिवसेनेचे नेते 'गजनी' बनलेत; सामनातील टीकेवरुन भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:08 PM2019-11-19T14:08:26+5:302019-11-19T14:10:04+5:30
शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे.
नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेत तणाव वाढलेला आहे. सामना अग्रलेखातून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवर भाजपानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला भाजपाने शिवसेनेला लगावला आहे.
यावेळी बोलताना जीवीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले की, आम्ही आहे त्याठिकाणीच उभे आहोत, बाहेर गेल्यानंतर तुम्ही कसं बोलू शकता की, तुम्ही घराचा हिस्सा आहात. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले, दोन दिवसांपूर्वी काही वेगळं बोलतात, आज काही वेगळं बोलतात अशा शब्दात शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे.
त्याचसोबत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चांगले सरकार देण्याचं वचन दिलं होतं. जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. तसेच जो पक्ष राजकारणासाठी सत्तेच्या मागे पळत असतो ते कधी ना कधी पक्ष विखुरता दिसतो असंही भाजपाने सांगितले आहे.
सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. एनडीएतून बाहेर काढणारे हे कोण?असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची घेतलेला पंगा भाजपला उखडून टाकणार,असा हल्लाबोल शिवसेनेने सामनातून केला आहे.
शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये असलेले मतभेद आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना सुरुवातीपासूनच एनडीएमध्ये होती. ज्याने ही घोषणा केली, त्याला शिवसेनेचे मर्म आणि कर्म कळले नाहीत. ज्या काळात भारतीय जनता पक्षाच्या जवळही कोण फिरकत नव्हतं. त्यावेळी एनडीएची स्थापना झाली. त्याच एनडीएमधून शिवसेनेला काढण्याची नीच घोषणा केल्याचे म्हटलं आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीच्या दिवशीच शिवसेनेला एनडीएमधून काढण्याची घोषणा करण्यात आली. सर्वजण विरोधात गेली असताना मोदींचा बचाव करणाऱ्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र मंबाजींना साथ देणार नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा बांबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही पंगा घेणाऱ्यांना देत आहोत, असंही आग्रलेखात म्हटलं आहे.