Johnson Baby Powder: तुम्हीही मुलांना 'ही' पावडर लावता? मग थांबा! चाचणीत ठरली फेल अन् लायसन्सही झालंय रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:46 AM2022-09-17T11:46:11+5:302022-09-17T11:48:27+5:30
जॉन्सन बेबी पावडर ( Johnson Baby Powder) बनवणारी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली-
जॉन्सन बेबी पावडर ( Johnson Baby Powder) बनवणारी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादकाच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे कंपनी आता महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री करू शकणार नाही. पावडरचे नमुने तपासले असता ते स्टँडर्ड क्वालिटीचे नसल्याचं निष्पन्न झालं आहे. जॉन्सन बेबी पावडरचे नमुने मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून घेण्यात आले होते.
एफडीएनं जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जॉन्सन बेबी पावडरचा वापर नवजात बालकाच्या त्वचेला नुकसान पोहोचवणारं ठरू शकतं. एफडीएनं तातडीनं कंपनीला जॉन्सन बेबी पावडरचा स्टॉक बाजारातून परत घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनानं ड्रग्ज अँड अॅडमिनिस्ट्रेशन अॅक्ट १९४० नुसार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. यात कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई का केली जाऊ नये याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.
लहानग्यांच्या त्वचेस ठरेल अपायकारक
जॉन्सन ॲण्ड जॉन्सनची पावडर प्रामुख्याने नवजात बाळांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. साठ्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे उत्पादनाचा सामू (पीएच) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही त्यामुळे संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा ‘जॉन्सन बेबी पावडर’ या उत्पादनाचा परवाना १५ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जॉन्सन अँड जॉन्सन जगभरातील आरोग्य तज्ञांच्या वैज्ञानिक विश्लेषणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यांच्या विश्लेषणानं पुष्टी केली की टॅल्क-आधारित जॉन्सनची बेबी पावडर सुरक्षित आहे. बेबी पावडरमध्ये एस्बेस्टोस नसून कर्करोग होत नाही, असा दावा कंपनीनं केला आहे.
भारतात मोठी मागणी
अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन दीर्घकाळापासून भारतात बेबी पावडरची विक्री करत आहे. कंपनीचे जॉन्सन बेबी पावडर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. बहुतेक घरांमध्ये लहान मुलांसाठी ही पावडर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतात, बेबी पावडर व्यतिरिक्त, कंपनी बेबी शॅम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल देखील विकते आणि त्याला प्रचंड मागणी आहे.