Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 09:51 AM2019-11-13T09:51:53+5:302019-11-13T09:56:57+5:30

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

Maharashtra Government decision of president rule taken under pressure of modi government blames digvijay singh | Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे.मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय यांनी केला.राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.

कानपूर - भाजपा-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे. कानपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी 'महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी योग्य प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यानंतर दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला बोलावण्यात आलं. मात्र, त्या पक्षाकडेही बहुमताचा आकडा नसल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आमंत्रित करण्यात आलं. या पक्षाला साडे आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्याआधी दुपारीच राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. यामागे नेमकं काय कारण आहे?' असं म्हटलं आहे. 

'नियमानुसार स्पष्ट बहुमत नसल्यास सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची  संधी दिली जाते. भाजपाने गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये हा नियम पाळला नाही आणि महाराष्ट्रात मात्र ही प्रक्रिया केली. मात्र ऐनवेळी जे बदल झाले ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा दबावामुळेच झाले आहेत' असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी विधानसभा निवडणुकीनंतर अशी राजवट लागू होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची क्षमता दाखवून देण्यासाठी तीन दिवसांची वेळ देण्याची विनंती अमान्य करण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

राष्ट्रपती राजवट का?

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपा-शिवसेना युतीला 161 जागांसह बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्रिपदावर दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे सरकार स्थापण्याचा दावा केला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला नंतर शिवसेनेला व शेवटी राष्ट्रवादीला सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी निमंत्रित केले, पण तिन्ही पक्ष त्याबाबत अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय उरला नाही.
 

Web Title: Maharashtra Government decision of president rule taken under pressure of modi government blames digvijay singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.