महाराष्ट्र, गुजरात प्रतिबंधित कापूस बियाणांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 04:58 AM2020-09-22T04:58:44+5:302020-09-22T04:59:01+5:30
महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांत यावर्षी ४० गुन्हे दाखल
नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात प्रतिबंध असूनही हबीसाईट टॉलरेंट बीटी कापूस बियाणांची विक्री महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुरू आहे. केंद्र सरकारने या राज्यांत बेकायदेशीरपणे या बियाणांच्या विक्रीचे प्रकार घडल्याचे मान्य केले. असे सर्वात जास्त बियाणे महाराष्ट्रात पकडले गेले.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे, बीड, जालना, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२,१४८ पाकीट बंद तथा १२९३ किलो बियाणे जप्त झाले व अवैध कापूस बियाणांप्रकरणी दोषींविरुद्ध ४० गुन्हे दाखल झाले.
मंत्र्यांनी लोकसभेत म्हटले की, महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरातमध्येही आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये चार जिल्ह्यांत कापसाच्या बेकायदा पीक विक्रीच्या पाच घटना समोर आल्या आहेत. त्यातील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात तोमर म्हणाले, तेलंगणच्या सीमावर्ती अदिलाबाद, मंचेरियल आणि असिफाबादसारख्या जिल्ह्यांत अशा बियाणांबाबत पोलीस संबंधित लोकांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहे.
बेकायदा कापूस बियाणे विक्रीप्रकरणी एक आंतरमंत्रालय निरीक्षण तथा वैज्ञानिक समिती स्थापन झाली आहे. या समितीने तात्काळ, अल्पकालिक व मध्यकालिक कारवाईची सूचना केली. याशिवाय कापूस उत्पादक राज्यांना याबाबत निर्देशही दिले गेले आहेत.
प्रतिबंधित रसायन, कीटनाशकाची विक्री नाही
महाराष्ट्रासह इतर राज्यांत अवैध रसायन तथा कीटनाशकांची विक्री होत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट नाकारले. प्रतिबंधित रसायने, कीटनाशकांच्या विक्रीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू,
उत्तराखंड, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, केरळ, ओदिशा, गोवा, मेघालय व मिझोराम राज्य सरकारांच्या हवाल्याने सांगितले की, असे काही घडलेले नाही. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणमध्ये अवैध रसायनांची विक्री झालेली नाही.