महाराष्ट्र, हरयाणा यांनी वाढवली भाजपची चिंता; दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:53 PM2024-05-28T13:53:24+5:302024-05-28T13:54:11+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणात झालेल्या लोकसभा निवडणुकांनी या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सत्ताधारी भाजपची चिंता वाढवली आहे. ४ महिन्यांनी महाराष्ट्र, हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. या दोन्ही राज्यांत भाजपची सरकारे आहेत. महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत सत्तेत आहे, तर हरयाणात दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीने साथ सोडल्याने तेथे अल्पमतातील भाजप सरकार आहे. भाजप दोन्ही राज्यांत संघर्ष करत आहे.
दोन्ही राज्यांत विजयाचा दावा करत भाजप सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवत असला, तरी पक्ष नेतृत्वाला वास्तविकता कळून चुकली आहे. महाराष्ट्रात युतीतील घटक पक्षांविरुद्ध अधिक सत्ताविरोधी लाट असून, वाट्याला आलेल्या मतदारसंघात पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे भाजप मानतो.
महाराष्ट्र, हरयाणा जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार
- महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप मोठे फेरबदल करू शकतो. दोन्ही राज्ये जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे.
- महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असून, नोव्हेंबर महिन्यात तेथे नवीन सरकार सत्तारूढ होणार आहे, असे सूत्रांकडून कळते.
जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका
- प्रदीर्घ काळापासून राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दि. ३० सप्टेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
- कलम ३७० हटविल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. लोकसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात ५२ टक्के मतदान झाल्याने तेथील लोकांना मजबूत लोकशाही हवी असल्याची आशा निर्माण झाली आहे. याआधी काश्मीर खोऱ्यात केवळ ९ टक्के मतदान होत होते.